मुरगूड : यमगे (ता. कागल) येथे गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या गावात तीस रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. रविवारी विद्यानगर परिसरातील तब्बल अठरा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने आठ दिवस गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गतवर्षी कोरोना साथीत अगदी एक, दोन रुग्णसंख्या असणाऱ्या यमगे गावात यावेळी ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने कोरोनाचा विस्फोट झाला आहे. सध्या गावात तीस रुग्ण उपचाराधिन आहेत तर काही रुग्णांचा अहवाल यायचा आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या गावातील मराठी शाळेच्या पाठीमागील विद्यानगर या वस्तीमध्ये रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत.
गावातील मराठी शाळेत विलगीकरण कक्ष सुरु केला असून, याठिकाणी पुरुष रुग्णांना ठेवण्यात आले आहे तर महिला रुग्णांना घरीच अलगीकरणात ठेवून उपचार सुरू आहेत. गावातील आरोग्य केंद्रातील कर्मचारी या रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु, रुग्णाची परिस्थिती बिघडली तर त्याला मुरगूड किंवा कागलला हलवावे लागते. यासाठी यमगे गावामध्येच सुसज्ज कोविड केंद्र तत्काळ उभे राहणे गरजेचे आहे.
गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय मुरगूड पोलिसांनी घेतला असून, यासाठी गावात काही पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ग्रामस्थांनी स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासन करत आहे. सध्या असणारी रुग्णसंख्या तसेच शिल्लक अहवाल व लक्षणे असणारे पण घरातच उपचार घेणारे रुग्ण यांचा विचार केल्यास ही संख्या चिंतनीय ठरणारी असेल. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.