कोल्हापूर : शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरात कोठेही, भाजीमंडईत भाजी विक्री होणार नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने शहरवासीयांकरिता भाजीविक्रेत्यांचे मोबाइल नंबर प्रसिद्ध केले असून, फोनवरच भाजी घरपोच मिळण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय महापालिकेने इझी ॲपही सुरू केले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. आठ दिवस सुरू राहणाऱ्या या लॉकडाऊनमुळे शहरवासीयांची भाजीपाला, किराणा मालाची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन महानगरपालिका मार्केट विभागाने सर्व भाजीमंडईतील भाजीविक्रेत्यांचे मोबाइल क्रमांक महापालिका फेसबुक अकाउंटवर जाहीर केले आहेत.
शहरातील ऋणमुक्तेश्वर भाजीमंडईतील ७०, ताराराणी मार्केट भाजीमंडईतील ३०, बोंद्रेनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, आपटेनगर येथील ७१, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट व शेंडापार्क येथील ३५, कपिलतीर्थ मार्केट येथील २१० भाजी विक्रेत्यांची नावे व मोबाइल क्रमांक दिले आहेत. ज्यांना भाजीपाला पाहिजे आहे, त्यांनी त्यांच्या भागातील भाजीविक्रेत्यांशी मोबाइलवर संपर्क साधून भाजी मागून घ्यायची आहे. यामध्ये काही अडचणी आल्यास शहर अभियंता नारायण भोसले- ९३४२७१७१११, इस्टेट अधिकारी सचिन भोसले- ९७६६५३२०३२, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख पंडित पोवार- ७०५७७९८५८५, मार्केट निरीक्षक गीता लखन- ९५०३५९३१३२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
घरपोच सेवा देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई
एकीकडे महानगरपालिकेने विक्रेत्यांना घरपोच सेवा देण्यास बजावले असताना रविवारी पोलिसांकडून मात्र अशी सेवा देणाऱ्या काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. याबाबत विक्रेत्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पालिका व पोलीस अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.