नाशिक : राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या एखाद्या नेत्यावर स्थानिक पातळीवरील पक्षीय जबाबदारी असल्यास त्या-त्या राजकीय पक्षाला व प्रमुखाला त्या व्यक्तीशिवाय पर्याय नसतो. मग त्या नेत्याने दुसऱ्या राजकीय पक्षाशी ‘घरोबा’ केल्यास त्या पक्षाला शून्यातून सुरुवात करावी लागते. मनसेचे नाशकातील सर्वेसर्वा वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर जर त्यांनी खचितच दुसऱ्या पक्षाशी राजकीय घरोबा केल्यास मनसेला पक्ष कार्यालयाचे नवनिर्माण करण्यापासूनच सुरुवात करावी लागणार असल्याची चर्चा मनसेच्या कार्यकर्त्यांत सुरु आहे.मुळातच मनसेच्या नाशकातील हालचालींचे केंद्रबिंदू आधीपासूनच मुंबई नाका आणि वसंत गिते यांचे संपर्क कार्यालय होते. यथावकाश तीन आमदार आणि चाळीस नगरसेवकांच्या जोरावर मग ठक्कर बाजारस्थित इमारतीत प्रशस्त जागेत मनसेचे कार्यालय थाटण्यात आले. त्याच्या उद्घाटनाला पक्षप्रमुख राज ठाकरे हेच उपस्थित होते. मुळातच हे कार्यालय पक्षाचे आहे की वसंत गिते व समीर शेटे यांच्या एकत्रित मालकीचे आहे, याबाबत मनसेच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेत सुफडा साफ झाल्यानंतर त्याचे बालंट पदाधिकाऱ्यांवर येणार याची कुणकुण लागताच मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा माजी आमदार वसंत गिते यांनी दिला अन् लगोलग जिल्हाध्यक्षांपासून थेट त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील नगरसेवकांपर्यंत राजीनाम्याचे लोण पसरले. विशेष म्हणजे, राज ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी दौऱ्यावर येणार म्हणून मनसेचे पक्ष कार्यालय असलेल्या राजगडाबाहेर भलामोठा मांडव टाकण्यात आला होता; मात्र वसंत गिते यांच्या राजीनाम्याची वेळ आणि मनसेच्या कार्यालयाबाहेर टाकण्यात आलेला मांडव पुन्हा रातोरात काढून घेण्याची वेळ कर्मधर्मसंयोगाने एकच झाली असावी. त्यामुळे आता मनसेचे ‘राजगड’ हे खऱ्या अर्थाने हलवण्याची वेळ आली काय, अशी दबक्या आवाजातील चर्चा मनसेच्या गोटात सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
आता पोलीसही २४ तास ‘आॅनलाईन’
By admin | Updated: November 5, 2014 00:22 IST