भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यात ‘वस्त्रनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील ३२ सायझर्सचे (प्रोसेस) वीज, पाणी तोडून त्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने दिले आहेत. सोमवारपर्यंत (१ जून) नोटीस दिलेल्या सायझर्सना म्हणणे मांंडण्याची संधी दिली आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई होणार आहे. सर्व्हेमध्ये जलस्रोत दूषित केल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई केली जाणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न न्यायालयात गेल्याने राजकीय दबाव जुगारत प्रदूषणाचे प्रशासन कारवाईचा बडगा उगारत आहे. त्यामुळे वस्त्रनगरीत खळबळ माजली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयात जनहित याचिका ाखल झाली आहे. यांतील एक याचिकाकर्ते इचलकरंजीचे आहेत. पंचगंगा प्रदूषण होण्यास लहान-मोठ्या उद्योगांतून बाहेर पडणारे औद्योगिक सांडपाणी कारणीभूत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी ‘प्रदूषण’चे प्रशासन सक्रिय झाले आहे. गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने कारवाईसंबंधी पाठपुरावा केला होता.कापडावर प्रक्रिया करून रंगकाम, नक्षीकाम, ब्लीचिंग करणारे अनेक उद्योग व सायझर्स इचलकरंजीत आहेत. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. दरम्यान, ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने इचलकरंजीत नोंदणीकृत असलेल्या १६९ पैकी ४० सायझर्सचा सर्व्हे गेल्या महिन्यात केला. त्यामधील तब्बल ३२ सायझर्सनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र घेतलेले नाही. एका सायझरकडून कमीत कमी ५०० ते १ हजार लिटर प्रदूषित पाणी गटारात सोडले जाते. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. सामुदायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात रीतसर सभासद नाहीत, असे गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.त्यामुळे संबंधित ३२ सायझर्सची वीज, पाणी कनेक्शन बंद करावे, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. वीज वितरण कंपनीला वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. पूर्णपणे उत्पादन बंद करण्याचीही कारवाई केली जाणार आहे. कारवाईसंबंधीची नोटीस पोहोचल्यानंतर सायझर्स एकत्रित येऊन कारवाई टाळण्यासाठी धावाधाव करीत आहेत. नव्याने रुजू झालेले ‘प्रदूषण’चे प्रादेशिक अधिकारी नरसिंग शिवांगी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी नूतन अधिकारी शिवांगी यांचे स्वागत करण्याच्या निमित्ताने नोटीस दिलेल्या सायझर्सच्या मालकांनी सोमवारपर्यंत कारवाई करू नका, अशी विनंती केली आहे. प्रदूषणच्या प्रशासनाने सोमवारपर्यंत त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने केलेल्या सर्व्हेमध्ये इचलकरंजीतील ३२ सायझर्स प्रदूषणास जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीज, पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. उत्पादन बंदचीही कारवाई होणार आहे. - मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळपंचगंगा प्रदूषणास जबाबदार असलेल्या सर्व घटकांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करीत राहणार आहे. इचलकरंजीमध्ये अनेक सायझर्सची कोठेही नोंद नाही. त्यांचे प्रदूषित पाणी पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे सर्वच उद्योगांचा सर्व्हे करून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी. - बंडू पाटील, अध्यक्ष, स्वाभिमानी युवा शेतकरी संघटना कोणाला नोटीस?इचलकरंजी शहर व परिसरातील नोटीस दिलेल्या सायझर्सची नावे: न्यू नॅशनल, अरुण सायझिंग, समृद्धी इंडस्ट्रीज, शंकर-पार्वती (कोरोची), लक्ष्मीप्रसाद, संगम, गोविंद, जठार टेक्सटाईल प्रा. लि., युनिट एक व दोन, सर्वेश्वर, ज्ञानेश्वर माउली, उज्ज्वला सायझिंग युनिट, महावीर, ओम, राधामाधव, कन्हैया, ओमकार, कल्लेश्वर, लाड ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज, रसाई, माउली, गुलाब आनंद, मयूर ब्लीचर्स, चौंडेश्वरी, गुरुकृपा, मोहन, बालनाथ, विमल, वंदना, हिरा को-आॅपरेटिव्ह टेक्सटाईल, राजविलास, भैरवनाथ, रामकृष्ण टेक्सफॅब प्रा. लिमिटेड (कोरोची).
३२ सायझर्सना नोटिसा
By admin | Updated: May 29, 2015 00:18 IST