धनंजय महाडिक यांचा आरोप : निवडणुकीपेक्षा ठरावधारकांचा जीव महत्त्वाचा : ५० हून अधिक ठरावधारक बाधित
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डोणोलीचे सुभाष पाटील यांंचा मृत्यू हा कोरोनाचा नव्हे, तर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हट्टाचा बळी असल्याचा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीनिमित्त उमेदवार ठरावधारकांना भेटत असतात, त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निवडणूक आज होईल किंवा उद्या होईल; पण ठरावधारकांचा जीव महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाडिक म्हणाले, कोरोनामुळे ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. निवडणूक होण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या काही संस्था न्यायालयात पाठविल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक स्थगित करण्यात यावी, असा काही ठरावधारकांचा प्रयत्न होता. उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाला दिले होते. मात्र, मंत्री पाटील यांनी कोल्हापुरात कोरोनाची परिस्थिती कमी आहे, तसेच योग्य काळजी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडू, असा हट्ट केल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. राज्यातील ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे, मग ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्यासाठी पालकमंत्र्यांचा हट्ट का? सध्या ‘गोकुळ’चे ५० ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मनुष्य हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.