कोल्हापूर : वाडी-रत्नागिरी येथील श्री जोतिबा यात्रेत गुलाल उधळण्यावर निर्बंध घालणे ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी केलेली घोषणा आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या धार्मिक प्रथेला खोडा घालण्याचा हा वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेला बाधा आणण्याचा प्रकार आहे. तरी हा तुघलकी निर्णय लादत असलेल्या लोकसेवकावर त्वरीत कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सकल हिंदू समाजने दिला.संभाजी साळूंखे, किशोर घाटगे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. गुलालावर निर्बंध घालून प्रशासनाला धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा प्रश्न जोतिबा भाविकांना पडला आहे. अशा घोषणा करताना प्रशासन समाजाच्या सहकार्याची अपेक्षा ठेवत असेल तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीदेखील समाजभावनेचा आदर करणे गरजेचे आहे. तुघलकी निर्णय समाजावर लादत असलेल्या लोकसेवकावर त्वरीत कारवाई करावी अन्यथा सकल हिंदु समाजाला याविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला.यावेळी विशाल पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, प्रमोद कारंडे, रणजी शिंगाडे, महेश यादव, अक्षय मोरे उपस्थित होते.
Kolhapur: जोतिबा यात्रेत गुलाल उधळण्यावर निर्बंध नको, सकल हिंदू समाजाची मागणी
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 18, 2024 19:31 IST