कोल्हापूर : जन्मदात्या आईच्या उपचारासाठी कोल्हापुरातील एका तरुण वृत्तपत्र विक्रेत्याचा संघर्ष सुरु आहे. दोन लाखांपेक्षा अधिक खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तो तणावात आहे. इतकी रक्कम आणायची कोठून, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. शाहूनगर, दत्त गल्लीतील अजित सूर्यवंशी असे या विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.
अजितच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई सुनीता सूर्यवंशी धुण्याभांड्याची कामे करुन कुटुंब चालवतात. दोन मुलींचा विवाह त्यांनी आपल्याकडील बचतीच्या पैशातून केला. मात्र, ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अजित यानेही घरची परिस्थिती बेताची असल्याने शाळा सोडून किराणा दुकानात काम सुरु केले. येथील पगारातून घरखर्च भागत नसल्यामुळे दौलतनगर परिसरात त्यांनी अंक विक्रेता म्हणून काम सुरु केले. आईची प्रकृती पुन्हा पहिल्यासारखी होण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यासाठी दोन लाख रुपये खर्च येणार असल्याने तो हतबल झाला आहे. प्रामाणिक अजितच्या मदतीसाठी कोल्हापुरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
चौकट
गोळा केलेले पैसेही झाले खर्च
अजितने आईवर उपचार व्हावे, यासाठी मित्र परिवाराकडून काही रक्कम जमा केली होती. पुढील उपचारासाठी त्याने रुग्णवहिकेतून पुण्याला नेले. तेथील डॉक्टरांनी मात्र शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून पुन्हा कोल्हापूरला पाठवले. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये काही दिवस त्यांच्यावर उपचार झाले. मात्र, तेथील खर्च परवडत नसल्यामुळे त्याने आईला पुन्हा सीपीआरमध्ये आणले आहे. येथील डॉक्टरांनी त्याला पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
प्रतिक्रिया
अचानकच आईची तब्येत बिघडली असून, डॉक्टरांनी दोन लाखांचा खर्च सांगितला आहे. मित्रांकडून जमवलेले पैसे पुण्यातील उपचारांसाठी संपले आहेत. शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने काय करावे कळत नाही.
अजित सूर्यवंशी, अंक विक्रेता