कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने राज्यातील संघटनात्मक निवडणुकांची घोषणा बुधवारी केली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या महानगर जिल्हाध्यक्षपदाबाबत चर्चेला जोर आला आहे. विद्यमान अध्यक्ष महेश जाधव यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ही निवड जानेवारी महिन्यात होणार असून, यासाठी महानगर जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे, उपाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांची नावे चर्चेत आहेत.बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस यांची बैठक होऊन संघटनात्मक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महानगर जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा विषय चर्चेत आला आहे.सध्या महेश जाधव यांच्याकडे महानगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. ते गेली आठ वर्षे या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाल आता संपत आला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळते, की नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते, याबाबत उत्सुकता आहे. जाधव यांना गत विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ४० हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही तेच उमेदवार असतील यादृष्टीने त्यांना पक्षाकडून ‘प्रोजेक्ट’ केले जात आहे. त्यांना ताकद मिळावी यासाठी त्यांना लाल दिव्याची गाडी असलेले ‘म्हाडा’चे अध्यक्षपद देण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीची घोषणा झाली असल्याने अध्यक्षपदाचा विषय चर्चेचा झाला आहे. जाधव हे सलग आठ वर्षे या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ की नवीन कार्यकर्त्याला संधी हा पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातील औत्सुक्याचा विषय आहे. या पदासाठी पक्षातून अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये महानगर जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे, उपाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, संदीप देसाई यांची नावे चर्चेत आहेत. संघटनात्मक निवडणुकांची घोषणा झाली असून, याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवड प्रक्रियेसाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. जिल्हाध्यक्ष पदाबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री पाटील यांच्यावरच अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)
नवीन चेहऱ्याला संधी की महेश जाधव यांना मुदतवाढ
By admin | Updated: November 20, 2015 00:37 IST