प्रकाश पाटील- कोपार्डेमहाराष्ट्रात कापूस या पिकानंतर उसाला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. उसापासून प्रामुख्याने महाराष्ट्रात साखर, गूळ निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी उच्च साखर उतारा मिळण्याबरोबर प्रति हेक्टर उसाचे उत्पादन मिळविण्यासाठी योग्य नियोजन व उसाच्या जातीचे योग्य बियाणे वापरावर भर देणे आवश्यक आहे. नियोजनाअभावी प्रति हेक्टर उत्पादन कमी मिळत असल्याने ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंत योग्य नियोजन हवे.महाराष्ट्रात प्रामुख्याने को-६७१, को-८६०३२, को-८०१४, को-९२००५, को-९८०७१ व ७२ तसेच नवीन सुधारित बियाण्यांमध्ये ४३४, ४३५ व को २६५ यांची शिफारस ऊस संशोधन केंद्राकडून करण्यात आली आहे; पण याची उपलब्धता व मागणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. म्हणूनच एकूणच सरासरी ऊस उत्पादनात प्रति हेक्टर वाढीसाठी ऊस बियाणे निवडीपासून दक्षता घेऊन नियोजन करावयास हवे...बियाणे निवडताना घ्यावयाची काळजीऊस बियाणे हे लागवडीपासून दर चार ते पाच वर्षांमध्ये बदलले पाहिजे. हे बियाणे निवडताना कृषी संशोधन केंद्र अथवा कारखान्याने मान्य केलेल्या बेणे मळ्यातून निवडावे.लागवडीवेळी या बेण्याचे वय ९ ते ११ महिने असावेऊस लागवडीसाठी खोडवा ऊस बियाणे म्हणून कधीही वापरू नये.ऊस लागण क्षेत्रातीलच ऊस हा लागवडीकरिता वापरावाहे क्षेत्र तणमुक्त, कीड अथवा रोगमुक्त असावे, पूरक्षेत्रातील नसावे. ऊस बियाणे भेसळमुक्त, शिफारस केलेले व सुधारित जातीचे असावे.फुटवा फुटलेले, मुळ्या आलेले, पाण्याची ओढ बसलेले, पोकळ बनलेले किंवा रंगलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नयेत.लागणीपूर्वीची रासायनिक बेणे प्रक्रियाजर बियाणे रोगरहीत किंवा कीडरहीत असेल, तर १०० लिटर पाण्यामध्ये १०० ग्रॅम कार्बेन्ड्रॅझिम मिसळून द्रावण चांगले ढवळावे. या द्रावणात तयार केलेल्या कांड्या १० ते १५ मिनिटे बुडवाव्यात व थोड्या वेळाने लावाव्यात. बियाणांवर जर पिठ्या रोग किंवा खवल्या यासारख्या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास मॅलाथिआॅन ५० ई.सी. ३० मि.लि. किंवा डायमिथोएट ३० ई. सी. २६५ मि.ली. हे. १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बियाणे १० ते १५ मिनिटे बुडवावे व सावलीत थोडावेळ सुकवणे अत्यंत गरजेचे आहे.बियाणांवरील प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी बियाणे तोडण्यासाठी धारदार खुरपे, अथवा कोयता वापरावा.बुडक्याच्या तळाच्या चार कांड्या व वरील वाडे तोडून बाजूला घ्यावे. कारण उगवणीसाठी ते निरुपयोगी असते. कांड्यावरील डाळ्यांच्यावर १/३ भाग ठेवून सरळ काप घ्यावा.काही ठिकाणी एक डोळा पद्धत, दोन डोळा पद्धत व तीन डोळा (शेंडाकांडी) पद्धतीने ऊस लागवड केली जात; पण तरीही एक डोळा व दोन डोळे पद्धतीनेच कांडी करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे बियाण्यांवरील जादा खर्च वाचतो. लागवडीसाठी तयार झालेल्या बियाण्यांची लागण ही तोडणीपासून १२ ते १४ तासांच्या आत केली गेली पाहिजे.
निकोप ऊस बियाण्यांची गरज
By admin | Updated: December 2, 2014 00:15 IST