उचगाव : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गवरील उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव गावांना जोडलेले अंडर पास ब्रीज वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करीत आहे. या बोगद्याची लांबी-रुंदी वाढविण्याची, तसेच फाईव्ह स्टार एमआयडीसीवरील लक्ष्मी टेक येथे उड्डाणपूल, कणेरीवाडी मुख्य हायवेवर उड्डाणपूल, गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाट्यावर नव्याने उड्डाणपूल करण्याची मागणी जागर फौंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उचगाव बोगदा रुंदीकरण, गोकुळ शिरगाव ते कणेरी ब्रीज रुंदीकरण होण्याची गरज आहे. उचगाव बोगदा ज्या ठिकाणाहून कोल्हापूर-हुपरी राज्यमार्गावरून जातो. या मार्गावरील वाहतूक पाहता हा बोगदा अरुंद केला गेला आहे. त्यामुळे दररोज या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे असंख्य वाहने तसानतास खोळंबून उभी राहतात. या बोगद्याची रुंदी वाठारमधील फ्लाय ओव्हरसारखी करण्यात यावी. गोकुळ शिरगाव एमआयडीसीतून कणेरीकडे जाणारा ब्रीज सिंगल असल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. या पुलाची रुंदी किमान डबल करून दुपदरी वाहतूक सुरू होईल एवढ्या आकाराची कमान बांधण्यात यावी. लक्ष्मी टेक येथे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या व पुरेशा लांबीचा ओव्हर ब्रीज बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भीमराव गोंधळी, सनी गोंधळी, प्रल्हाद गोंधळी, संदीप गोंधळी यांच्या सह्या आहेत.
फोटो ओळ:
पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल व मोठ्या ब्रीजच्य्या मागणीचे निवेदन देताना बी. जी. मांगले, भीमराव गोंधळी, सनी गोंधळी, प्रल्हाद गोंधळी, संदीप गोंधळी, आदी उपस्थित होते.