कोल्हापूर : महापौरांना मुदतवाढ देणारी अधिसूचना राज्य शासनाने मागे घेतल्यानंतर महापालिकेत महापौर बदलाचे वारे जोरात वाहत आहे. महापौर सुनीता राऊत काही दिवसांतच राजीनामा देतील. आमच्यापैकी कोणालाही हे पद द्या, मात्र राष्ट्रवादीचाच महापौर झाला पाहिजे, असा दबाव नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टाकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपैकी महिला उमेदवार की ‘जनसुराज्य’च्या मृदुला पुरेकर यांना महापौरपदाचा मान मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने राज्य शासनाने अधिनियमाद्वारे येत्या सहा महिन्यांसाठी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपमहापौर, तसेच नगराध्यक्षांना मुदतवाढ देत नवीन निवडीस प्रतिबंध करणारी अधिसूचना शासनाने मागे घेतली. महापौर सुनीता राऊत यांना सहा महिन्यांसाठी दिलेली महापौरपदाची मुदत २ जुलैला संपली. त्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी महापौरपदी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व महिला उमेदवारांनी फिल्डिंग लावली आहे. कारभारी नगरसेवक जयंत पाटील यांच्या मदतीने ‘जनसुराज्य’च्या मृदुला पुरेकर यांचे पती माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे.
महापौरपदासाठी पुन्हा राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी
By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST