कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भाषांतराच्या नव्या प्रकल्पात लेखिका सोनाली नवांगुळ यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी केले. साहित्य अकादमी पुरस्काराच्या मानकरी ठरल्याबद्दल नवांगुळ यांचा विद्यापीठातर्फे पुष्पगुच्छ व पुस्तकभेट देऊन सत्कार करण्यात आला.
नवांगुळ यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठ भविष्यात भाषांतराचा एक महत्त्वाचा प्रकल्प राबवणार आहे. त्यात सोनाली नवांगुळ यांनीही सहभागी व्हावे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये दिव्यांगांना सेवा-सुविधा पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लेखिका नवांगुळ यांनीही इमारतीला भेट देऊन काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.
लेखिका नवांगुळ यांनीही शिवाजी विद्यापीठ आपले असल्याने सांगून, भाषांतराच्या प्रकल्पात सहभागी होण्यासंबंधी सकारात्मकता दाखवली.
चौकट
तमिळनाडूच्या
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राज्यभरातील विविध मान्यवरांकडून नवांगुळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तमिळ लेखिका सलमा यांची मूळ तमिळ कादंबरीचे इंग्रजी भाषांतर झाले होते. त्याचे मराठी अनुवाद केलेल्या साहित्यकृतीस पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लेखिका नवांगुळ यांचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अभिनंदन केले.
फोटो : २००९२०२१-कोल- नवांगुळ सत्कार
कोल्हापुरातील लेखिका सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोमवारी शिवाजी विद्यापीठातर्फे त्यांचा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व पुस्तकभेट देऊन सत्कार करण्यात आला.