गारगोटी : ‘भुदरगड तालुक्यातील सर्वांत मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. स्वत:ला काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणवणारे शिवसेनेचे झेंडे खांद्यावर घेऊन कार्यक्रमात पुढे असतात’, अशी घणाघाती टीका माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली.ते कूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साताप्पा खोंद्रे होते.ते पुढे म्हणाले, ‘मोदींच्या फसव्या लाटेने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या लाटेत निवडून आलेल्या आमदारांनी ‘शायनिंग इंडिया’चे खोटे स्वप्न राज्याला दाखवित राज्याची अवस्था दयनीय केली आहे. यावेळी ‘बिद्री’चे संचालक जीवनराव पाटील प्रास्ताविकात म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या तालुक्यातील हा पाचवा मेळावा आहे. यानिमित्त मी विरोधकांना असे आव्हान करतो की, जर केडीसीसी बँकेची निवडणूक लागली तर त्यांनी स्वत: उभे राहावे. गरीब कार्यकर्त्यांचा बळी देऊ नये.यावेळी माजी आमदार नामदेवराव भोईटे म्हणाले, के. पी. पाटील यांच्याकडे निर्णयक्षमता असल्यानेच कर्जबाजारी असलेल्या बिद्री कारखान्यावर को-जन. प्रकल्प उभारून यशस्वी केला आहे. डिस्टिलरी प्रोजेक्ट परत घालविला त्या दिनकरराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही. आज कारखाना सक्षम आहे.मेळाव्यात अनिल हळदकर, बाजीराव राजिगरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मिणचे खोऱ्यातील मडिलगे, गंगापूर, म्हसवे, निळपणसह गारगोटी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यास माजी जि. प. सदस्य पी. डी. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, सभापती विलास कांबळे, माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार, धनाजीराव देसाई, रणजितसिंह पाटील, मुदाळचे सरपंच प्राचार्य विकास पाटील, सुनील कांबळे, विलास झोरे, ‘बिद्री’चे माजी संचालक मधुकर जाधव, टी. एल. पाटील, माजी सरपंच वसंतराव चोडणकर, पै. विष्णुपंत हळदकर, माजी सरपंच अण्णासो पाटील, माजी उपसरपंच मदन पाटील, अॅड. मोहन पाटील, सरपंच रूपाली खोत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भुदरगडमध्ये राष्ट्रवादी जि.प.च्या सर्व जागा जिंकणार
By admin | Updated: June 4, 2016 00:30 IST