चंदगड : गेले पाच हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना सुरू करावा, यासाठी सोमवारी सर्वपक्षीय दौलत बचाव कृती समितीने येथील पंचायत समितीच्या सांस्कृतिक सभागृहात बैठक बोलाविली होती. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य ए. एस. जांभळे होते. यावेळी ‘दौलत’ सुरू व्हावा, यासाठी माजी आमदार नरसिंगराव पाटील, तसेच ‘दौलत’चे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे किमान २०१६-१७ च्या हंगामात तरी ‘दौलत’ सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.प्राचार्य बी. एल. पाटील यांनी प्रास्ताविक करून ‘दौलत’ सुरू होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन ‘दौलत’ सुरू करावा व तालुक्यातील शेतकरी, कामगारांना दिलासा द्यावा, असे सांगितले. बैठकीला विविध राजकीय पक्षांचे सभासद उपस्थित असल्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ माजला. यावेळी कृती समितीचे प्रा. एन. एस. पाटील यांनी भूतकाळातील उणीदुणी न काढता भविष्यकाळात ‘दौलत’ सुरू होण्यासाठी सकारात्मक मते मांडावीत, अशी विनंती केली.यावेळी माजी आमदार नरसिंगराव पाटील म्हणाले, ‘दौलत’ शेतकऱ्यांचा असल्याने त्याची विक्री होऊ देणार नाही, अशी माझी ठाम भूमिका आहे. कथाकथन आणि भाषण करून ‘दौलत’चा प्रश्न सुटणार नाही. ‘दौलत’च्या विक्रीला विरोध केल्याने जिल्हा बँक माझ्या विरोधात आहे. काहीही झाले तरी ‘दौलत’ची विक्री करू देणार नाही. कारखाना सुरू करण्यासाठी मी विरोध केल्याचे सिद्ध झाल्यास त्याच ठिकाणी राजकीय संन्यास घेतो, असे त्यांनी सभागृहात सांगितले.गोपाळराव पाटील म्हणाले, दौलत कारखाना सुरू करण्यासाठी आपण सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. जिल्हा बँकेने २००९ मध्ये ‘दौलत’च्या पूर्व हंगामासाठी ११ कोटी कर्ज मंजूर केले होते. मात्र, राजकीय षङ्यंत्रामुळे कर्ज नामंजूर करण्यात आले. त्यावेळी बँकेने ११ कोटी दिले असते, तर दौलतची ही अवस्था झाली नसती. जिल्हा बँकेला ११७ कोटी मुदलावर २४० कोटी रुपये व्याज अदा केलेले आहे. त्यामुळे ‘दौलत’मुळे जिल्हा बँक अडचणीत आली म्हणणे चुकीचे आहे. ‘दौलत’ सुरू करण्यासाठी कृती समितीला सहकार्य करू, असेही ते म्हणाले. यावेळी नितीन पाटील, प्रा. एन. एस. पाटील, प्राचार्य ए. एस. जांभळे, गुंडू निवगिरे, बाळाराम फडके, शंकर मनवाडकर, हणमंत पाटील, सुरेश हरेर, प्रा. दीपक पाटील यांनी सूचना मांडल्या. बैठकीला उपसभापती शांताराम पाटील, शामराव मुरकुटे, उदयकुमार देशपांडे, कृष्णा रेंगडे, गुंडू सावंत, वसंत चव्हाण, गावडू पाटील, पांडुरंग चव्हाण, सुरेश चव्हाण-पाटील, एस. एम. कोले, भरमाण्णा गावडा, निंगो गुरव, अशोक कांबळे, तुकाराम बेनके उपस्थित होते. जे. बी. पाटील यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)भूमिका मांडा : दोन्ही नेत्यांकडे मागणीचंदगड येथील सर्वपक्षीय बैठकीत अॅड. संतोष मळवीकर यांनी नरसिंगराव व गोपाळराव यांनी दौलत साखर कारखान्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी केली. ाळवीकर यांच्या या मागणीला उपस्थित शेतकरी व कामगारांनी दुजोरा दिला. यामुळे या दोन्ही नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. दौलत कारखाना सुरू करण्यात यावा, अशी इच्छा नरसिंगराव पाटील आणि गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केली.
नरसिंगराव, गोपाळराव ‘दौलत’साठी एकत्र
By admin | Updated: March 22, 2016 00:45 IST