कोल्हापूर : राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नियुक्ती झालेल्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी न्यू पॅलेसवर अलोट गर्दी केली होती. सुमारे पाच तास शुभेच्छुकांची गर्दी होती. छत्रपती घराण्याचे हे निवासस्थान असलेला न्यू पॅलेस परिसर आनंदी अन् जल्लोषी वातावरणाने न्हाऊन निघाला. फटाक्याच्या आतषबाजीने न्यू पॅलेसवर जणू दिवाळीच साजरी झाली. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती घोषणा झाली. त्यावेळी ते सहकुटुंब बाहेरगावी होते. रविवारी पहाटे ते कोल्हापुरात न्यू पॅलेसवर आपल्या निवासस्थानी पोहोचले. ते आल्याचे समजताच सकाळी सातपासून कार्यकर्त्यांची मांदियाळी न्यू पॅलेसवर सुरू झाली. सकाळी नऊ वाजता युवराज संभाजीराजे पॅलेसच्या सभागृहात मुलगा श्रीमंत युवराजकुमार शहाजीराजे यांच्यासोबत आले. तेथे राजेशाहीमध्ये थाटात त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी एकमेकाला गुलाल लावून आनंदोत्सव साजरा केला. सतेज पाटील यांच्याकडून शुभेच्छाआमदार सतेज पाटील यांनी महापौर, काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांसमवेत नूतन खासदार युवराज संभाजीराजे यांना रविवारी शुभेच्छा दिल्या.पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत आमदार पाटील हे सकाळी साडेअकराच्या सुमारास न्यू पॅलेस येथे आले तेथे त्यांनी संभाजीराजे यांचा सत्कार केला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, नगरसेवक शारंगधर देशमुख, लाला भोसले, तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे, शशिकांत बनसोडे, निलोफर आजरेकर, वृषाली कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार, आदी उपस्थित होते. महाडिक, मंडलिक एकत्रलोकसभेसाठी परस्परांविरुद्ध उभारलेले खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक हे दोघे आपल्या कार्यकर्त्यांसह एकाचवेळी न्यू पॅलेसवर सकाळी अकरा वाजता आले. एकत्र चर्चा करतच जावून त्यांनी युवराज संभाजीराजे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अनेक सामाजिक विषयावरील कामांसाठी तिन्ही खासदार एकत्र विचार मांडू, असे संभाजीराजे यांनी यावेळी महाडिक यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमल महाडिक, रामराजे कुपेकर, नगरसेवक सत्यजीत कदम, संग्राम निकम तसेच ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘राजे तुम्ही बराच काळ सोसलासा, आता चांगले दिवस आलेत’ : शाहू महाराजरविवारी सकाळी न्यू पॅलेसच्या सभागृहात युवराज संभाजीराजे यांचे त्यांची आई, पत्नी, भावजय या तिघींनी औक्षण केले. त्यानंतर संभाजीराजे यांनी प्रथम पिता श्रीमंत शाहू महाराज यांचे डोके टेकून चरणस्पर्श केले. त्यानंतर उठून मुजरा केला, त्याचवेळी संभाजीराजे गहिवरले. यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. याचवेळी श्रीमंत शाहू महाराज यांनी त्यांना मिठी मारून आपल्या छातीवर त्यांचे डोके ठेवून ‘सावरा आता स्वत:ला. यापूर्वी तुम्ही बराच काळ सोसला. आता चांगले दिवस आलेत, सावरा’, असे म्हणत संभाजीराजेंची पाठ थोपटली. त्यानंतर प्रेमाने त्यांनी संभाजीराजेंच्या गालाचा मुका घेतला. या गहिवरल्या वातावरणावेळी वेळोवेळी होणारा जयघोषही कार्यकर्त्यांनी थांबवला व समोरील दृश्याने साऱ्यांच्याच नयनांत पाणी तरले.या भावनिक वातावरणावेळी संपूर्ण दरबार कार्यकर्त्यांनी खचाखच भरला असतानाही निरव शांतता होती. त्यानंतर त्यांनी आपले बंधू माजी आमदार मालोजीराजे यांच्याकडे वळत त्यांना मिठी मारून आलिंगन दिले. याचवेळी श्रीमंत शाहू महाराज यांनी आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसत दोन्हीही मुलांच्या पाठीवर हात फिरवला. तसेच दोघांना एकत्र उभे करून फोटो घेण्यास भाग पाडले. त्यानंतर सर्वांना नमस्कार करत असतानाच पुन्हा शांत झालेला दरबार संभाजीराजेंच्या जयघोषात न्हाऊन निघाला. कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना खांद्यावर उचलून बाहेर आणले....अन् पॅलेस प्रवेशद्वाराला तोरण चढविलेसंभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या स्वागताच्या तयारीची मधुरिमाराजे यांची लगबग पॅलेसवर जाणवत होती. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास न्यू पॅलेसच्या मुख्य प्रवेशद्वाराला निशिगंध आणि बकुळीच्या सुवासिक फुलांचे भव्य तोरण बांधण्यात आल्यानंतर तुतारीच्या निनादात शिवजयघोष करण्यात आला.विजयाचा तिलक आणि औक्षणयुवराज संभाजीराजे यांचे राजेशाही थाटात औक्षण करण्यासाठी सभागृहातील मांडणी ऐतिहासिक पद्धतीने करण्यात आली होती. संभाजीराजेंच्या बैठक व्यवस्थेच्या दोन्ही बाजूला दिवे लावले होते तर संभाजीराजेंच्या उजव्या बाजूला पुत्र श्रीमंत युवराजकुमार शहाजीराजे तर डाव्या बाजूला श्रीमंत राजकुमार यशराजे बसले होते. त्यावेळी मातोश्री श्रीमती महाराणी याज्ञसेनीराजे छत्रपती यांनी प्रथम कपाळावर तिलक लावून त्यांचे औक्षण केले. त्यानंतर पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे व पाठोपाठ मधुरिमाराजे यांनी औक्षण केले.मान्यवरांची उपस्थितीन्यू पॅलेसच्या हिरवळीवर रविवारी नूतन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांतील मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, धैर्यशील देसाई, रामराजे कुपेकर, विश्वविजय खानविलकर, माजी महापौर आर. के. पोवार, बाजीराव चव्हाण, विजयराव सूर्यवंशी, संभाजी जाधव, गणी आजरेकर, शिवाजीराव मोहिते, पारस ओसवाल, बाळासाहेब इंगळे, ऋतुराज इंगळे, माणिक मंडलिक, सभापती पिंटू लोहार, विनायक फाळके, निवृत्त पोलीस उपअधीक्षक जयवंतराव देशमुख-वत्रे, डी. बी. पाटील, नगरसेवक, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे पदाधिकारी, आदींनी शुभेच्छा दिल्या.नियुक्तीचा आनंद शब्दांपलीकडला : संभाजीराजे कोल्हापूर : मी शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात पोहोचविण्याचे काम करत आहे. मी शिव-शाहू यांच्या रक्ताचा वारसदार असल्याचा सार्थ अभिमान आहे, पण त्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारसा म्हणून माझी खासदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल मला आनंद झाला असला तरीही त्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत, असे उद्गार नूतन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ‘लोकमत’शी बोलताना रविवारी काढले. निवासस्थानी न्यू पॅलेसवर त्यांच्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.माझी खासदार म्हणून नियुक्ती झाली असली तरी गडकोट संवर्धनाचे काम अखंडपणे सुरूच राहणार, तसेच शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व बहुजनांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम, कर्तव्य सुरुच राहणार आहे. याच कामाची दखल घेऊन मला खासदारकी दिली आहे. माझी झालेली निवड ही दुय्यम आहे, पण शिव-शाहू राजांच्या विचारांची ही निवड आहे, असेही युवराज संभाजीराजे म्हणाले.संभाजीराजेंच्या आतापर्यंतच्या कामाची ही पोचपावती असून, या संधीचे ते निश्चित सोने करतील. देशातील अनेक घराण्यांत वेगवेगळे पक्ष कार्यरत आहेत. त्यामुळे यामध्ये काही नावीन्य नाही. कोल्हापूर शहर व राज्याच्या विकासासाठी पक्षविरहित एकत्रित काम करू. - मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार संभाजीराजेंनी गेली दहा वर्षे विविध प्रश्नांसह गड संवर्धन, मराठा आरक्षण हे विषय चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी बळ मिळाले आहे. - धनंजय महाडिक, खासदारयुवराज संभाजीराजे यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदारपदी झालेली नियुक्ती हा कोल्हापूरचा सन्मान आहे. त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल.- सतेज पाटील, आमदार
..अन् न्यू पॅलेसचा दरबार गहिवरला!--नियुक्तीचा आनंद शब्दांपलीकडला : संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 01:00 IST