कोल्हापूर : महापुरास कारणीभूत ठरलेल्या नाल्यांवरील रेडझोनमधील बांधकामे हटवण्याच्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलनाची माेहिमेची सुरुवातच वादावादीने झाली. खानविलकर पेट्रोल पंपानजीकच्या केबिन हटवण्यावरून खोकीधारकांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने दुपारी वातावरण तणावपूर्ण बनले. अधिकारीही कारवाईवर ठाम राहिल्याने अखेर खोकी स्वत: उतरवून घेईपर्यंत जेसीबी चालवू नये, असा तोडगा निघाला.
कोल्हापूर शहरातील महापुराची तीव्रता वाढीस लागण्याची कारणे शोधण्यासाठी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या आदेशाने शहरातील नाले, ओढ्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. या नाल्यावरील अतिक्रमणामुळे पाणी जास्त तुंबत असल्याचे लक्षात आल्यानंतर अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यासाठी नाल्यावर बांधकामे असलेल्या खोकीधारकांना २४ तासांत जागा रिकामी करण्याची नोटीस काढण्यात आली होती. शुक्रवारी त्याची मुदत संपली तरी खोकीधारकांनी अतिक्रमण उतरवून न घेतल्याने उपशहर अभियंता हर्षद घाटगे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्या नेतृत्वाखाली खानविलकर पंपाच्या आजूबाजूला लागून असलेल्या केबिनवर जेसीबीचा हातोडा लावण्यास सुरुवात केली. यावरून चायनीजचा खोका असलेला एक जण थेट अधिकाऱ्यांच्या अंगावरच धावून आला. बड्या बिल्डरांचे अतिक्रमण दिसत नाही, मग आमच्यावरच कारवाई का, असे सांगत हुज्जत घालू लागला. यातून अधिकारी रमेश मस्कर यांना शिवीगाळही केली. यावरून वातावरण बरेच तापले. पोलिसांना धाव घेतल्याने पुढील प्रसंग टळला.
केबिनधारकांनी केलेल्या विनंतीनुसार खोकी उतरवून घेण्याची मुदत अधिकाऱ्यांनी दिली. संध्याकाळपर्यंत हे काम सुरूच होते. दरम्यान हे सुरू असतानाच दुपारी शिवसेनेचे शहरप्रमुख जयवंत हारुगले, रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्यासह शिवसैनिक दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून कारवाई माहिती घेतली. खासगी जागा असतानाही कारवाई का, असा सवाल केला; पण यावर अधिकाऱ्यांनीही रेडझोनमधील बांधकामाच्या नियमाचा हवाला देत याची बोलती बंद केल्याने सर्व जण आल्या पावली माघारी फिरले.
चौकट
केबिन अनधिकृत तरी वीज कनेक्शन
दोन वर्षांत इथे केबिनधारकांवर तिसऱ्यांदा कारवाई होत आहे. सिमेंट काँकीट, पत्र्यासह मजबूत केबिन येथे उभारल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक केबिनला महावितरणचे मीटरसह स्वतंत्र लाइट कनेक्शन आहे. सर्वसामान्यांना मीटरसाठी येरझाऱ्या माराव्या लागत असताना अनधिकृत बांधकामांना कसे काय कनेक्शन दिले, असा सवाल येथे उपस्थित केला जात होता.
चौकट
आठवडाभर चालणार कारवाई
आता नाल्यावरील अतिक्रमणाचे सर्व्हे बऱ्यापैकी पूर्ण झाले असून नोटिसा पाठवून या संपूर्ण आठवडाभर ती अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. केबिनधारकांनी स्वत:हून ते उतवून घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
फोटो: २००८२०२१-कोल-अतिक्रमण ०१
फोटो ओळ : कोल्हापुरात शुक्रवारी खानविलकर पेट्रोल पंपाजवळीलच्या अतिक्रमित केबिन हटवण्यावरून खोकीधारक व प्रशासनामध्ये जोरदार वादावादी झाली.
(छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो: २००८२०२१-कोल-अतिक्रमण ०२
फोटो ओळ : कोल्हापुरात खानविलकर पेट्रोल पंपानजीकची अतिक्रमणे नोटीस देऊनही न उतरवून घेतल्याने अखेर शुक्रवारी दुपारी कारवाई सुरू झाली. जेसीबी आल्यानंतर मग केबिन उचलण्यासाठी धावपळ उडाली.