कोल्हापूर : बालशिक्षणाग्रही माईसाहेब बावडेकर यांचा जीवनपट मांडणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनास आज, गुरुवारपासून प्रारंभ झाला. माईसाहेबांच्या बालपणापासून ते त्यांनी जोपासलेले छंद, विवाह सोहळा, सरदार घराण्याचा थाट, बालशिक्षणासाठीची त्यांची तळमळ आणि ज्ञानार्थी विद्यार्थी घडवल्यानंतर झालेला सन्मान हा सगळा प्रवास या छायाचित्रांतून उलगडतो. माईसाहेब बावडेकर शिक्षण संस्थेच्या हॉलमध्ये आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण सभापती संजय मोहिते, उपसभापती महेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माधवराजे बावडेकर, नीतू बावडेकर, नीलराजे बावडेकर उपस्थित होते. या प्रदर्शनातील छायाचित्रे माईसाहेबांचे बालपण, त्यांनी खेळलेले खेल, माहेर सरदार रास्ते घराणे, संगीत, पटाच्या खेळात रमलेल्या माईसाहेब, प्राण्यांची आवड, आणि भाऊसाहेब बावडेकर यांच्याशी झालेला विवाह सोहळा त्या काळातील घराणेशाहीचा बाज दर्शवतात. विवाहानंतर माईसाहेब गगनबावडा येथील वाड्यात काही दिवस होत्या. तिथे रामनवमीला रामाच्या पालखीचे त्यांनी केलेले स्वागत, गगनगडाचे सौंदर्य ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रांतूनही व्यक्त होते. पळसंब्यातील माधवबाग या वाड्यात काही वर्षे त्या राहिल्या होत्या. भाऊसाहेबांच्या निधनानंतर मार्इंनी स्वत:ला शिक्षणकार्यात झोकून दिले. त्यासाठी त्यांनी इटली येथे ताराबाई मोडक यांच्यासमवेत इटली दौरा केला. त्या दौऱ्याचीही फलनिष्पत्ती यातून कळते. माईसाहेब ज्यांना गुरू मानत त्या मॅडम माँटेसरी यांच्याशी असलेले ऋणानुबंध ही छायाचित्रांतून व्यक्त होते. बालमंदिरची उभारणी, त्यावेळी मुलांना ने-आण करण्याची खास गाडी, बालमंदिरचे स्नेहसंमेलन, माध्यमिक शाळेची उभारणी, सिंधुतार्इंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाळेला दिलेल्या भेटी, शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष इथंपर्यंतचा प्रवास ही छायाचित्रे उलगडतात. मार्इंना मिळालेल्या विविध पुरस्कारांची छायाचित्रेही येथे लावण्यात आली आहेत. हे प्रदर्शन सात तारखेपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सुरू राहणार आहे, तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
छायाचित्रांतून उलगडला माईसाहेबांचा जीवनपट
By admin | Updated: December 5, 2014 00:20 IST