कोल्हापूर : रंकाळा तलावात माय-लेकीने आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. राजश्री मच्छिंद्र वायदंडे (वय २३, रा. फुलेवाडी, बोंद्रेनगर) आणि तिची मुलगी समृद्धी (५) अशी त्यांची नावे आहेत. राजश्री ही मुलगीला घेऊन मंगळवारी रात्री घरातून निघून गेली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले, रंकाळा तलाव अंबाई टँकसमोरील गार्डनच्या बाजूला महिला व लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना येथील माळीकाम करणाऱ्याला दिसून आला. त्याने या प्रकाराची वर्दी जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलीस कॉन्स्टेबल राजू डांगे यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून ते सीपीआर शवगृहात हलविले. त्यानंतर मायलेक बेपत्ता असल्याची वर्दी कोठे दाखल झाली आहे का, याची चाचपणी सर्व पोलीस ठाण्यांच्या स्तरावर केली असता फुलेवाडी, बोंद्रेनगर येथून राजश्री वायदंडे ही मुलगीसह मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी तिच्या पतीशी संपर्क साधून त्यांना सीपीआर शवगृहात मृतदेह दाखविले असता तो पत्नी व मुलगीचा असल्याचे त्यांनी ओळखले. राजश्री वायदंडे हिला दोन मुले व एक मुलगी आहे. पती मोलमजुरी करतो. ती खासगी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून नोकरीस होती. तिने मुलीला घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (वार्ताहर)
रंकाळा तलावात मायलेकीची आत्महत्या
By admin | Updated: November 19, 2015 01:18 IST