बााबासाहेब नेर्ले
गांधीनगर : घरातील सततच्या वादाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी घर सोडून बेपत्ता झालेल्या महिलेचा गांधीनगर पोलिसांनी शोध घेऊन ताटातूट झालेल्या माय-लेकरांची भेट घालून दिली आहे. लता उदय मोरे या दोन वर्षांपूर्वी घरातील वादामुळे घर सोडून निघून गेल्या होत्या. याप्रकरणी तिचे पती उदय बबन मोरे रा. फुलेवाडी यांनी १० एप्रिल २०१९ रोजी पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली होती. लता यांना दोन लहान मुले आहेत. आईच्या विरहाने ही मुले कासावीस झाली होती. त्यामुळे गांधीनगर पोलिसांनी या महिलेचा तपास करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न चालिवले होते. दरम्यान, सदर महिला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तिला ताब्यात घेत त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. हातावरचे पोट असणाऱ्या या कुटुंबीयाला महिनाभर पुरेल इतके रेशन देऊन पोलिसांनी माणुसकीचेही दर्शन घडविले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, सपोनि भांडवलकर, मोहन गवळी, विराज डांगे, चेतन बोंगाळे, अशोक पोवार, आकाश पाटील उपस्थित होते.