लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी/ पेठवडगाव/ जयसिंगपूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गाठीभेटींचा धडाकाच लावला. आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राजू आवळे, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची भेट घेऊन राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
‘गोकुळ’साठी तगडे पॅनेल बांधणीसाठी दोन्ही आघाड्यांकडून व्यूहरचना सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार प्रकाश आवाडे, उल्हास पाटील यांच्यासह हातकणंगले, शिरोळमधील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यानंतर मंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. दुपारी संध्यादेवी कुपेकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर आमदार राजू आवळे यांच्या इचलकरंजी येथील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी, निवडणुकीत शाहू आघाडीसोबत असून हातकणंगले तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार राजू आवळे यांनी दिली.
त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी आमदार प्रकाश आवाडे व कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट घेतली. ‘गोकुळ’चे नंदनवन करण्यासाठी एकवेळ आम्हाला संधी द्यावी, असे साकडे त्यांनी आवाडे पितापुत्रांना घातले. बंद खोलीतील चर्चेनंतर मंत्री मुश्रीफ म्हणाले, आवाडे दादांनी आशीर्वाद दिले आहेत. अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष आहे; कारण जिल्ह्यात आवाडे व राजू शेट्टी यांना वगळून राजकारण करता येत नाही, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे, नगरसेवक मदन कारंडे, संजय कांबळे, दीपक सुर्वे, शशांक बावचकर, अमित गाताडे, प्रकाश मोरे उपस्थित होते.
‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी भेट दिली. शेट्टी पंढरपूर येथे असल्याने त्यांच्या मातोश्री रत्नाबाई यांची भेट घेऊन दोन्ही मंत्र्यांनी सावकर मादनाईक यांच्याशी चर्चा केली. उल्हास पाटील यांच्या घरी घाऊन ‘गोकुळ’च्या लढाईत आपल्यासोबत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर ’दत्त’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची भेट घेतली. भाजपचे अनिल यादव व ‘गोकुळ’चे माजी संचालक दिलीप पाटील यांची शिरोळ येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आराेग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांनी रविवारच्या गाठीभेटी थांबविल्या.
आवाडेंच्या तिसऱ्या आघाडीची धास्ती
आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘गोकुळ’मध्ये तिसरी आघाडी करण्याची घोषणा केल्यानंतर सत्तारूढ व विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातूनच दोन्ही आघाड्यांच्या प्रमुखांनी आवाडे यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
छाननीनंतर आवाडेंचा निर्णय
‘गोकुळ’साठी छाननीनंतर किती राहतात, हे पाहणार आहे. आजी-माजी संचालक आपल्या संपर्कात असून अर्जांची छाननी झाल्यानंतर निर्णय घेऊ असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
‘गोकुळ’चे नव्हे, घरचे दूध !
प्रकाश आवाडे यांनी दोन्ही मंत्र्यांना चहा घेणार की कॉफी, असे विचारताच, ‘गोकुळ’च्या दुधाचा असेल, तर काहीही चालेल, असे मंत्री म्हणाले, यावर ‘आमच्याकडे गोकुळचे दूध येत नाही. घरच्या जनावरांचे दूध असल्या’चा टोला आवाडे यांनी हाणल्याने एकच हशा पिकला.
...तर ‘गोकुळ’चा निकाल वेगळा
सध्या जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांची जोडी चांगली जमली आहे. मागील गोकुळच्या निवडणुकीत हीच जोडी असती, तर निकाल कदाचित वेगळा असता, अशी टिप्पणी आमदार आवाडे यांनी केली.