कागल : विधान परिषदेच्या निवडणुकीतील माझ्या विजयाचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ आहेत, हे मी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. कागल तालुक्यातील प्रा. संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे हे पण माझ्या पाठीशी राहिले. कै. विक्रमसिंहराजे, कै. सदाशिवराव मंडलिकांची ‘कसर’ कागलमधील नेत्यांनी भरून काढली, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. निवडणुकीनंतर आ. पाटील यांनी शनिवारी कागलला भेट देऊन नगरसेवक मतदारांबरोबरच आ. मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. आ. मुश्रीफांच्या निवासस्थानी ते बोलत होते. आ. सतेज पाटील म्हणाले, सदाशिवराव मंडलिकांनी नेहमीच वाईट प्रवृत्तीला विरोध केला, तर स्वर्गीय राजेसाहेबांचे व माझे चांगले संबंध होते. या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील नेत्यांनी मला दिलेले पाठबळ महत्त्वाचे आहे. १८ वर्षे कोणतेही काम न करता निव्वळ नेतृत्व करणाऱ्या प्रवृत्तीला यामुळे धडा मिळाला आहे. माझा विजय हा सांघिक नेतृत्वाचा विजय आहे. येथील बसस्थानकाजवळील छ. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आ. पाटील गैबी चौकात आले. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गैबी दर्ग्यात जाऊन पिरांचे दर्शन घेतले. तेथून चालत ते आ. मुश्रीफांच्या निवासस्थानी आले. आ. पाटील यांचा सत्कार आ. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवराज पाटील, भैया माने, नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, सर्व नगरसेवक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, विकास पाटील, सिद्राम पाटील, सूर्यकांत पाटील, बाळ पाटील, शिवाजीराव गाडेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयात जाऊन समरजितसिंह घाटगे यांची भेट घेतली. आ. पाटील यांच्याबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, महेश पाटील, बाबासो माळी, एकनाथ पाटील, विलास खाडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुश्रीफ, घाटगे, मंडलिक यशाचे शिल्पकार
By admin | Updated: January 3, 2016 00:32 IST