कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून समाजासोबत राहणार आहोत. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ कोविडच्या नावाखाली मराठा समाजाची मुस्कटदाबी सुरू आहे. लोक हे सहन करणार नाहीत, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला त्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल केली का, तर नाही, मराठा समाजाला इतर मागास समाजप्रमाणे सवलती दिल्या का तर नाही. कारण काय तर कोरोना. कोरोनामुळे तुम्ही काय काय करायचे थांबवणार आहात. हे संकट आले तरी भ्रष्टाचार सुरूच आहे. शिवभोजनची थाळी पाच रुपये आणि मुंबईच्या कोविड सेंटरमधील थाळी ३८० रुपये. तेही कंत्राट आपल्याच माणसाला हे सर्व सुरू आहे. एमपीएससी झालेल्या युवक युवतींना नियुक्तीपत्रे देणे बाकी आहे. ही मुस्कटदाबी आता सहन केली जाणार नाही.
मराठा आरक्षणाबाबत आम्ही आंदोलन करणार नाही. परंतु जे आंदोलन करतील त्यांच्यासोबत आम्ही राहू. सचिन सावंत मधे शांत होते. त्यांच्या नेत्याला आम्ही घाबरत नाही तर त्यांना काय घाबरणार, असेही पाटील यांनी सांगितले.
चौकट
झोपेत असतानाच सरकार पडेल
हे सरकार आल्यापासून बॅगा भरूनच आहे. त्यांना मिळालेले दीड वर्ष हा बोनस आहे. झोपेत असतानाच हे सरकार पडेल असेही यावेळी पाटील यांनी सांगितले. मात्र ते कसे आणि कधी पडणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.