कोरोना आढावा बैठक
मुरगूड : संपूर्ण राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. दोन दिवसांपासून शहरातही रुग्ण सापडले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. प्रशासन युद्धपातळीवर प्रतिबंधाची तयारी करत आहे. वय वर्षे ४५ पूर्ण असणाऱ्या सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्य केले जाईल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरगूडमध्ये मुरगूड नगरपरिषद , ग्रामीण रुग्णालय, मुरगूड व मुरगूड पोलीस स्टेशन प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष जमादार बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. पल्लवी तारळकर, मुरगूड पोलीस स्टेशनचे एपीआय विकास बडवे, डॉ. संजय रामसे, नगरसेवक विशाल सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते राहुल वंडकर, नगरसेविका सुप्रिया भाट, रंजना मंडलिक, रेखा मांगले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना व त्यासंबंधी पूर्वतयारी काय करता येईल, या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच मुरगूडमधील वय वर्षे ४५ पूर्ण असणाऱ्या सर्व नागरिकांनी एप्रिलअखेर १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी रविवारीसुद्धा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरगूडमधील व्यापारीवर्ग व नागरिकांनी गर्दी टाळून, मास्कचा व सॅनिटायझरचा सर्रास वापर करावा, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीस प्रभाग समिती सचिव अनिकेत सूर्यवंशी, बाळू शेळके, विनायक रणवरे, दिलीप कांबळे, अमोल गावडे, स्वप्नील भोसले, मंदार सूर्यवंशी, रमेश मुन्ने, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर आदी उपस्थित होते.