नागरिकांकडून दिशाभूल
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : वैभव असलेल्या मुन्सिपल हायस्कूलची स्थापना १९०४ साली झाली होती. पाचवी ते दहावीचे वर्ग या ठिकाणी सुरुवातीला भरत होते. सुरुवातीला १८५० पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत होते पण आजच्या घडीला येथे केवळ १४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुन्सीपल हायस्कूलच्या प्रगतीसाठी हस्तांतरण करण्याचा विचार चालू आहे. हायस्कूल हस्तांतरण म्हणजे मुन्सिपल शाळा बंद करणे असे नव्हे, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिले.
निपाणी नगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा होत असून या सभेत मुन्सिपल हायस्कूल हस्तांतरण हा विषय गाजणार आहे.
तत्पूर्वीच शहरातून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी पत्रकार परिषद घेऊन मुन्सिपल हायस्कूलच्या हस्तांतरण विषयाबद्दल काही नागरिकांकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की मुन्सिपल हायस्कूलमधील मराठी विभागातील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पाचवी ते सातवीचे वर्ग यापूर्वीच बंद करण्यात आले असून सध्या आठवी ते दहावी असे तीन वर्ग सुरू आहेत. या ठिकाणी सध्या १४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे सात शिक्षक असून त्या शाळेला शिपाई नाही.