कोल्हापूर : महापालिकेचा डंपरचालक व वाहकाला टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथे नेऊन त्यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच लुटल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झालेल्या पाचजणांना शाहुपुरी पोलिसांनी इंदापूर तालुक्यातून(जि. पुणे) शिताफीने अटक केली.
अटक केलल्या संशयितांची नावे : आदेश बाळू बोराटे (वय १८ रा. यादववाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), अब्दुल हरिश्चंद्र बोराटे (२४ रा. यादववाडी काटी, ता. इंदापूर), गणेश रामचंद्र इनामी (२०), अक्षय बाळू नरुट (२४ रा. रा. नरुटवाडी, ता. इंदापूर), अनिल बापूराव उफाडे (१९ रा. कालतण, ता. इंदापूर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित पाचजण गोव्याहून स्कार्पिओ गाडीतूृन इंदापूरला जात होते. दि. २४ ऑगष्ट रोजी कोल्हापुरात कसबा बावडा, संकपाळनगरात त्यांच्या गाडी ओव्हरटेकच्या प्रयत्नात कोल्हापूर महापालिकेच्या डंपरला घासली. संतप्त स्कार्पिओचालकाने गाडी डंपरच्या आडवी थांबवली. गाडीतील पाच जणांनी डंपरचालक तात्यासाहेब यशवंत लोंढे (वय ४९, रा. भोई गल्ली, सी वॉर्ड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर), सुनील रघुनाथ जगदाळे (रा. लक्ष्मीपुरी) यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने स्कार्पिओत बसवले. त्यांना टोप संभापूर भागात नेऊन दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाइल व १२०० रुपये काढून घेऊन त्यांना तेथेच सोडून ते सर्वजण पळून गेेले. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद झाला होता.
दरम्यान, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. तपासात संशयित पाचजण हल्लेखोर इंदापूर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी इंदापुरात जाऊन पाचही संशयितांना अटक केली. त्याच्या ताब्यातील मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ गाडी जप्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. राजेश गवळी यांच्या पथकातील सहा. पो. नि. राहुल वाघमारे, सचिन पांढरे, सहा. फौ. संदीप जाधव, पोलीस जगदीश बामणीकर, अनिल पाटील, शुभम संकपाळ, राजू वरक, तानाजी चौगले, दिनेश गावीत यांनी केली.
सीसी टीव्ही फुटेजमुळे उलगडा
दोघांना घेऊन स्कार्पिओ गाडी ही न्यायालय परिसरात आली. त्यानंतर ती पुन्हा वळून टोप संभापूरला गेली, त्या दरम्यानच्या कालावधीतील मार्गावरील सीसी टीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात सीसी टीव्ही फुटेजमध्ये संबंधित स्कार्पिओ आढळली, त्या गाडीच्या नंबरद्वारे त्यांचा माग काढत संशयितांना पोलिसांनी अटक केली.