इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या शहर कार्यालयात शनिवारी सायंकाळी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत असे ठरविण्यात आले. यावर मात्र ३ नोव्हेंबरला बैठक घेऊन शिक्कामोर्तब करण्याचे निश्चित केले. नगराध्यक्षा बिरंजे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्यास नकार देत बंड केले होते. त्यांच्या बंडास शहर विकास आघाडी व कारंडे गटाने पाठिंबा दिला. त्यावेळी आपण काँग्रेसच्याच आहोत, असे नगराध्यक्षा बिरंजे सांगत असल्या तरी काँग्रेसच्या नगरसेवक व नगरसेविकांविषयी त्या दुजाभाव करीत असल्याची तक्रार वारंवार होत होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काँग्रेसच्या शहर कार्यालयात नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीसाठी शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, माजी अध्यक्ष अशोकराव आरगे, सभापती रवी रजपुते, सुजाता भोंगाळे, रत्नमाला भागवत, संजय कांबळे, सुप्रिया गोंदकर आदी १९ नगरसेवक- नगरसेविका उपस्थित होते. नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे बहुमत असल्याने आपआपल्या प्रभागातील विकासकामे शक्तीने रेटण्याचा आणि नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना भेटण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच पक्षप्रतोद सुनील पाटील हे विदेशातून परतल्यावर ३ नोव्हेंबर (मंगळवारी)ला सर्वसमावेशक बैठक घेऊन सोक्षमोक्ष लावण्याचेही ठरले. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षांवर अविश्वास ठरावाच्या हालचाली
By admin | Updated: November 1, 2015 00:58 IST