जयसिंगपूर : शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला आठ वर्षे पूर्ण झाली असून गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. शासनाने गंभीरपणे दखल न घेतल्यामुळे गुन्हेगार मोकाट फिरत असून अजूनही दाभोळकरांना न्याय मिळाला नसल्याने जयसिंगपुरात शिरोळ तालुक्यातील पुरोगामी संघटनेच्यावतीने मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजवादी प्रबोधिनी शाखा जयसिंगपूर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्र सेवा दल व शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
दसरा चौक ते क्रांती चौक या मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी बाबासाहेब नदाफ, डॉ. चिदानंद आवळेकर, कुंभोजकर, रघुनाथ देशिंगे, डॉ. अजित बिरनाळे, डॉ. अतिक पटेल, डॉ. महावीर अक्कोळे यांनी शासन व्यवस्थेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या मॉर्निंग वॉक रॅलीमध्ये शिरोळ तालुक्यातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कामगार, पुरोगामी संघटनेचे विचारवंत व महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
फोटो - २००८२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पुरोगामी संघटनेच्यावतीने मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली.