संदीप बावचे : शिरोळ
शिरोळ तालुक्यात १ हजार ८० अॅक्टिव्ह रुग्ण असून शासकीय कोविड सेंटरमध्ये २८० रुग्ण उपचार घेत आहेत. तर घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या ४१९ असून उर्वरित रुग्ण खासगी ठिकाणी उपचार घेत आहेत. ४७ दिवसात ५५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळेना, अशी परिस्थिती आहे.
१ एप्रिल ते १७ मे अखेर २८५९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १७७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली असलीतरी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांमुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने तालुक्यातील २२ शाळा क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतल्या आहेत.
सध्या घर टू घर सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला नागरिकांनी घरी रुग्ण असल्याची माहिती देऊन लक्षणे असलेल्यांनी स्वॅब तपासणीसाठी देणे तितकेच गरजेचे आहे. तरच रुग्णसंख्या रोखता येणार आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासन यंत्रणा हतबल झाली आहे.
----------------------
चौकट - खासगी रुग्णालये अधिक
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाची तीन रुग्णालये असून यामध्ये २८० बेड आहेत. तालुक्यातील खासगी ठिकाणी तर उर्वरित रुग्ण सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर याठिकाणी उपचार घेत आहेत. सरकारी कोविड सेंटरमध्ये सुविधांची वाणवा असल्याने खासगी रुग्णालयांचे चांगलेच फावत आहे. तर खासगी लॅबमध्ये तपासणीचे प्रमाण वाढले आहे.
चौकट - खासगीमध्ये दैनंदिन दर कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयातील अतिदक्षतामध्ये ऑक्सिजनवर असेल तर दिवसाला साडेसात हजार रुपये, अतिदक्षता बाहेरील जनरल वॉर्डमध्ये प्रतिदिन चार हजार रुपये खर्च येतो. दहा दिवसाला साधारणत: प्रत्येक रुग्णाला ७० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.