लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात रक्तदान चळवळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच पन्नासपेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या ‘सुपर डोनर’ची संख्याही शंभरहून अधिक आहे. ज्या ज्यावेळी रक्तदानाची हाक दिली जाते, त्यावेळी रक्तदानासाठी पुढे येणाऱ्यांची संख्याही खूप असते.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पूर्वनियोजित शस्त्रक्रियांसह इतर व्याधींवरील उपचारांवर काहीसी मर्यादा आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यानंतर हळूहळू इतर शस्त्रक्रिया व उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यांच्यासाठीही रक्ताची मागणी वाढल्याने सध्या जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू लागली आहे. यासाठी ‘लोकमत’ने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
‘लोकमत’तर्फे उद्यापासून रक्तदान मोहीम
‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ तर्फे ‘लोकमत नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ अशी हाक देऊन उद्या, शुक्रवारपासून महाशिबिर सुरू होत आहे.
रक्तदानासाठी येथे संपर्क साधा..
‘लोकमत’च्यावतीने दहा दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना ग्रुपने तसेच संस्था, संघटना, तालीम, गणेश मंडळ, तरुण मंडळांना या महाअभियानात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी शिबिराच्या आयोजनासंदर्भात सचिन कोळी : ९७६७२६४८८५, विक्रांत देसाई : ९६३७३३०७०० यांच्याशी संपर्क साधावा.
८३ वेळा रक्तदान करणारे दिलीप घाटे
राजारामपुरी सहावी गल्लीतील दिलीप घाटे हे १९७३ पासून नित्यनियमाने रक्तदान करत आहेत. आतापर्यंत त्यांनी ८३ वेळा रक्तदान केले आहे. आता त्यांचे वय ७१ झाले तरी ते रक्तदानासाठी उत्सुक आहेत, मात्र नियमाने ते करू शकत नाहीत. स्वत:ला रक्तदान करता येत नाही, म्हणून ते थांबले नाहीत. सध्या ते रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेत आहेत.
प्लेटलेट डोनर शैलेश बांदेकर
रक्तामध्ये प्लेटलेट हा घटक महत्त्वाचा असतो. रायगड कॉलजी येथील शैलेश बांदेकर यांनी ७६ वेळा प्लेटलेट्स दान केले आहे. महाविद्यालयात असल्यापासून ते रक्तदान करत आहेत. आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर त्यापेक्षा वेगळा आनंद तरी काय? या भावनेतून त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात रक्तदान व त्यानंतर प्लेटलेट्स देण्यास सुरुवात केली. रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करून नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन बांदेकर यांनी केले आहे.