कोल्हापूर : पासपोर्ट मिळण्याचा कालावधी अत्यंत कमी केला असून केवळ दीड हजार रुपयांत परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास अर्जदाराच्या पत्त्यावर एका महिन्यात पासपोर्ट मिळू शकतो. त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची अथवा लाच देण्याची आवश्यकता नाही अशी माहिती पुण्याचे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी शनिवारी येथे दिली. पासपोर्ट सेवा शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा प्रमुख उपस्थित होते. शनिवारी १५० जणांना पासपोर्ट देण्यात आले, तर रविवारी उर्वरित पासपोर्ट देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात हे दोन दिवसांचे शिबिर शनिवारपासून सुरू झाले. खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा सधन असल्याने जिल्ह्यातून विविध करणांसाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालयाची अत्यंत आवश्यकता असून, ते लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील आहे. पासपोर्ट मिळण्यासाठी पोलिसांकडील अहवाल आवश्यक आहे; पण त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. पोलीस ठाण्यांचे संगणकीकरण झाल्याने जिल्ह्यातील सर्व क्राईम रेकॉर्ड एकत्रितपणे उपलब्ध आहे. त्यामुळे तपासणीसाठी लागणारा कालावधी कमी झाला आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय पातळीवरील होत असलेल्या दहशतवादी कारवाया लक्षात घेता पोलिसांकडून कागदपत्रांची पडताळणी सूक्ष्मपणे होणे आवश्यक असल्याने त्यासाठीचा आवश्यक वेळ मिळणे गरजेचे आहे. पासपोर्ट अधिकारी गोतसुर्वे म्हणाले, पासपोर्ट हा आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनत असून, आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम बनत आहे. शैक्षणिक, धार्मिक, पर्यटन, व्यवसाय, नोकरीच्या संधी, आदी कारणांसाठी पासपोर्ट आवश्यक बनला आहे. अनेक आय. टी. कंपन्यांनी पासपोर्ट असणे अनिवार्य केले आहे. नागरिकांच्या दारात जाऊन ही सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजर्दाराने खोटी माहिती देऊ नये. माहिती खोटी दिल्याचे सिद्ध झाल्यास तो गुन्हा ठरवून आर्थिक दंड व शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे खऱ्या माहितीसह अर्जदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. या शिबिराला पासपोर्ट अर्ज दाखल केलेले अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जतिन पोटे यांनी आभार मानले. ( प्रतिनिधी )
महिन्यात घरपोच पासपोर्ट
By admin | Updated: November 22, 2015 00:35 IST