कोल्हापूर : शहरासह उपनगरांत सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गुरुवारी दिवसभरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये आठजणांना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल व्हावे लागले. त्यामध्ये मोकाट कुत्रे चावल्याने दोन घटनांत सहाजण जखमी झाले.
गेल्या काही महिन्यात शहर व परिसरात कुत्र्यांचा उच्छाद वाढल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. उपनगरात रात्रीच्यावेळी रस्त्यावरून जाणे धाडसाचे ठरत आहे. वाहनचालकांच्या मागे मोकाट कुत्री लागण्याच्या तसेच कुत्रे चावण्याच्या घटनांत वाढ होत आहे. अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गुरुवारी सकाळी गांधी मैदान परिसरात मोकाट कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याने त्याची दहशत निर्माण झाली. चावा घेतलेल्यांपैकी बाबासाहेब लहू पाटील (वय ५५, रा. फुलेवाडी), म्हादू दाजी शिंदे (६०, रा. क. बीड), ओंकार शिवाजी साठे (२१, नंदगाव, ता. करवीर) उत्तम नामदेव पाटील (४०, रा. यवती, ता. करवीर), विनोद सनोडीया (३०, रा. शिवाजी पेठ, मूळ- उत्तर प्रदेश) हे जखमी झाले; तर दसरा चौकातही एका मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने पादचारी समाधान पाटील (३०, रा. वडणगे) हे जखमी झाले.
फुलेवाडी रिंगरोडवर बोंद्रेनगर येथे रस्त्यात मोकाट कुत्रे आडवे आल्याने दुचाकीवरुन निघालेले कुलदीप बबन काटकर (३९, रा. मगदूम कॉलनी, पाचगाव) हे रस्त्यावर पडून जखमी झाले; तर कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर दोनवडे फाटा (ता. करवीर) येथे कुत्रे रस्त्यात आडवे आल्याने दुचाकीवरून पडून दत्तात्रय बाळासाहेब भोसले (वय ३४, रा. कुडित्रे, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. या सर्वांवर सीपीआर रुग़्णालयात उपचार सुरू आहेत.