जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता :
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीबरोबरच पदोन्नती देण्यात आली. मात्र, पदोन्नतीनुसार कामाची जबाबदारी नको आहे. कॅशियर, शाखाधिकारी म्हणून जबाबदारी घेण्यास शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे.
जिल्हा बँकेचा कारभार मुख्य कार्यालयासह १९१ शाखांच्या माध्यमातून सुरू आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीमुळे प्रशासक आले. त्यानंतर २०१५ ला संचालक मंडळ सत्तेवर आले. संचालक मंडळाने काटसकरीचा कारभार करत बँकेचा तोटा कमी करून नफ्यात आणली. काटकसरीचा भाग म्हणून खर्चिक निर्णय घेणे बँकेने टाळले. त्याचाच भाग म्हणून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती थांबवल्या होत्या. गेल्या चार महिन्यांपासून युनियनने आग्रह धरल्यानंतर पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली. सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना चतुर्थमधून थर्ड ग्रेडमध्ये पदोन्नती देण्यात आली. मात्र, पदोन्नती देताना त्यानुसार काम करण्यास तयार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले आहे. पदोन्नतीबरोबर प्रत्येकाला ४२०० ते ५२०० रुपयांपर्यंत पगारवाढ देण्यात आली. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, पदोन्नतीनुसार कामाची जबाबदारी स्वीकारण्यास काही कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे.
पन्नास कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीच नाकारली
पदोन्नती घेतली तर जबाबदारी घ्यावी लागत असल्याने ५० कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारून चतुर्थमध्येच काम करण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.
कोट-
ज्यांना पदोन्नती दिली आहे, त्या कर्मचाऱ्यांनी त्याप्रमाणे काम केले पाहिजे. चतुर्थश्रेणीमध्ये असताना बँक प्रशासनाने शाखाधिकारी व कॅशियर म्हणून जबाबदारी दिली आणि आता त्यांना लिपिक म्हणून पुन्हा काम लावले जाते, हे योग्य नाही.
- भगवान पाटील (अध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियन)