कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीत न झालेल्या व विधानसभा निवडणुकीत झालेल्या सभेने महाडिक कुटुंबीयांना सहा महिन्यांत दोनदा गुलाल मिळाला. त्यांच्याबाबतीत हा विचित्र योगायोग जुळला आहे.लोकसभेला धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक होते. त्यादरम्यान भाजपचे नेते असलेले नरेंद्र मोदी हे सांगलीतील त्यांच्या पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा घेण्यासाठी आले होते. कोल्हापुरात ते ९ एप्रिलला विमानतळावर आले होते. तिथे विमानतळावरच त्यांची सभा व्हावी, असा जिल्ह्यांतील शिवसेना-भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न होता; परंतु तसे घडले नाही. ही सभा होऊ नये यासाठी त्यावेळी महाडिक यांनी देव पाण्यात घातले होते. कारण ही सभा झाली असती तर वातावरण नक्कीच बदलले असते व कदाचित त्याचा फटका महाडिक यांना बसला असता. त्यामुळे ही सभा होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली व त्यात ते यशस्वी झाले.आता मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांची विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा येथील तपोवन मैदानावर झाली. ही सभा प्रत्यक्ष मतदानापासून अगोदर दहा दिवस झाल्याने त्याचा फारसा प्रभाव राहणार नाही, असे काँग्रेसवाल्यांना वाटत होते; परंतु तसे झाले नाही. अमल महाडिक यांच्या विजयात या सभेचा मोठा वाटा आहे. सक्षम उमेदवार व त्याला ‘मोदी लाटे’ची हवा मिळाल्यानेच कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा अमल महाडिक हे पराभव करू शकले. लोकसभेला मोदी यांची सभा झाली नाही म्हणून धनंजय महाडिक यांचा विजय झाला व आता विधानसभेला मोदी यांची सभा झाल्याने अमल महाडिक यांचा विजय. ‘मोदी, महाडिक व गुलाल’ यांचे असे हे समीकरण बनले आहे. (प्रतिनिधी)
मोदी..महाडिक अन् गुलाल
By admin | Updated: October 22, 2014 00:25 IST