इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्राला संपविण्यासाठी छुपे राजकारण करीत आहेत. केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या चार महिन्यांत त्यांनी अनेक प्रकल्प गुजरातला हलविले. अशा मोदींना आणि भाजपला महाराष्ट्रातील जनता कधीही स्वीकारणार नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. येथील घोरपडे नाट्यगृह चौकात कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश आवाडे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. भाजपचे सर्वेसर्वा असणारे नरेंद्र मोदी व अमित शहा महाराष्ट्राला संपविण्यासाठी छुपे राजकारण करीत आहेत, असा आरोप करून चव्हाण म्हणाले, केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या चार महिन्यांत त्यांनी अनेक प्रकल्प गुजरातला हलविले. गुजरातच्या मुख्यमंत्री येथे येऊन मुंबईतील उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. अशा मोदींना आणि मोदींच्या भाजपला महाराष्ट्रातील जनता कधीही स्वीकारणार नाही; पण नरेंद्र मोदी मात्र सध्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून सभा घेत सुटले आहेत. मोदी मॅजिक टिकविण्याचा आटापिटा करीत आहेत. (प्रतिनिधी)मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे चेहरा नाहीभाजपने आपल्या अहंकारापोटी २५ वर्षांचा मित्र शिवसेनेला काडीमोड दिला. ‘अच्छे दिन आनेवाले’ म्हणणाऱ्या भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही चेहरा नाही, हे दुर्दैव आहे. निवडणुका झाल्यावर मोदी काय दिल्लीतून रिमोट कंट्रोलरने राज्य चालविणार आहेत काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. गुजरात मॉडेलपेक्षा कितीतरी पटीने महाराष्ट्र पुढे आहे, असेही यावेळी चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्राला संपविण्यासाठी मोदी, शहांचे छुपे राजकारण
By admin | Updated: October 13, 2014 00:39 IST