कोल्हापूर : घरगुती गणपती आरास करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या गणेशभक्तांंचे दोन मोबाइल अज्ञाताने चोरल्याच्या घटना घडल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या चोरीच्या तक्रारी शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. याशिवाय पाच-सहा जणांनी मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्याच नाहीत.
गणेश चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला घरात आरास करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पापाची तिकटी ते महानगरपालिका या पानलाइन रस्त्यासह महापालिकेच्या पिछाडीस असणाऱ्या कटलरी दुकानात गर्दी झाली होती. खरेदीदारांनी रस्ते फुलून गेले होते. अशा गर्दीचा फायदा उठवीत अज्ञात चोरट्यांनी गणेशभक्तांचे मोबाइल संच लंपास केल्याच्या घटना घडल्या. यातील पांडुरंग शंकर मेंगाणे (वय ४८, रा. कोलोली, ता. पन्हाळा) यांनी आठ हजार रुपयांचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार दिली, तर बाजार गेट परिसरातून २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरी झाल्याची तक्रार धनाजी प्रकाश घोटणे (वय ४३, रा. रविवार पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.