सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा आदर्श आणि वडील डॉ. संजय. डी. पाटील, काका पालकमंत्री सतेज पाटील यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची साथ, नागरिकांच्या पाठबळावर आमदार ऋतुराज पाटील हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी आर. पी. ग्रुपच्या माध्यमातून तरुणाईचे संघटन केले. पुढे ऋतुराज पाटील फाउंडेशनद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कसबा बावडा येथील वॉर्डची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. त्याची दखल घेवून त्यांना कॉंग्रेस नेतृत्वाने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून लढण्याची संधी दिली. कार्यकर्त्यांची साथ आणि जनतेच्या पाठबळावर या संधीचे सोने करत वयाच्या २९ वर्षी ते आमदार झाले. ‘नवं कोल्हापूर’ घडविण्यासह शेतकरी, सर्वसामान्य, कामगार, उद्योजक, तरुणाई महिला, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांचे प्रश्न सोडविण्याचे ‘व्हिजन’ घेऊन ते कार्यरत आहेत. शासन दरबारी विविध घटकांचे अनेक प्रश्न मांडून ते सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे.
समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडविणार, त्यांना मदत करणार पण, त्याचा कोणताही गाजावाजा ते करत नाहीत. मतदारसंघातील शहरामधील नगरसेवक आणि गावांमधील सरपंच, कार्यकर्त्यांशी त्यांचा सातत्याने संपर्क आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी ते सर्वातोपरी प्रयत्न करतात. तरुणाईचे ते आयडॉल आहेत. प्रचंड जनसंपर्क आणि सर्वसामान्यांमध्ये एकरूप होणारे असे हे नेतृत्व आहे. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. एखाद्या प्रश्न, समस्या अथवा विषय हा त्याची माहिती असणाऱ्या व्यक्तींकडून समजून घेवून त्याबाबत ठोस कार्यवाही करणे, अशी आमदार पाटील यांची कार्यप्रणाली आहे. सर्वसामान्य असो, की अधिकारी प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेवून ते पुढील कार्यवाही करतात. संयमी आणि आश्वासक नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. ‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून अनेकांच्या हाताला त्यांनी काम मिळवून दिले. ‘सतेज-ऋतु’ मोहिमेअंतर्गत कोल्हापूर दक्षिणमध्ये दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प करून पर्यावरण रक्षणाला बळ दिले आहे. गेल्या वर्षी लावलेली पाच हजार झाडे बहरली असून यंदासुद्धा पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कोल्हापूर, महाराष्ट्राचा देशपातळीवर लौकिक वाढविलेल्या डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना आरोग्यसेवा पुरविली. सन २०१९ मधील महापूर आणि गेल्यावर्षीच्या कोरोना संकटात त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यांनी जनतेशी आपली नाळ कायम राखली आहे.
चौकट
सामाजिक बांधिलकी जपणारा वाढदिवस
नवनवीन संकल्पना राबवून आमदार पाटील हे कोल्हापूरसह दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. कोरोनामुळे त्यांनी गेल्यावर्षी वाढदिवस साजरा केला नाही. त्याऐवजी जनतेच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देणारे उपक्रम राबविले. त्यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या एक लाख होमिओपॅॅथिक औषधांच्या आणि दहा हजार सॅॅनिटायझर स्प्रे बॉटल्स, चाळीस हजार मास्कचे वाटप केले. सुमारे २५०० रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार केली. बंदोबस्ताला असलेल्या सुमारे दोन हजार पोलिसांना एन ९५ मास्क, फूड पॅॅकेट दिली. रेशनकार्ड नसलेल्या दहा हजार गरजू कुटुंबांना धान्य वाटप केले. व्हाईट आर्मी संस्थेच्या अन्नछत्रासाठी धान्य, सॅॅनिटायझर चेंबर आणि त्यांच्या जवानांसाठी पीपीई कीट दिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील एक हजार खासगी डॉक्टरांना, आयसोलेशन हॉस्पिटलमधील कम्युनिटी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आणि कसबा बावडा, लाईन बाजार येथील डॉक्टरांना पीपीई कीटचे वाटप केले. प्रसारमाध्यमांतील पत्रकार, छायाचित्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क वाटप केले आहे. यावर्षी गरजूंना मदत ही संकल्पना घेऊन कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी आपल्या भागातील, परिसरातील, गावातील गरजू लोकांना कोणत्याही स्वरूपात शक्य असेल त्याप्रमाणे मदत करावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
चौकट
कोरोना विरोधातील लढ्यातील योद्धा
गेल्यावर्षी कोरोना संकटात कार्यरत असताना आमदार पाटील यांना कोरोनाने गाठले. त्याच्यावर यशस्वीपणे मात करून ते पुन्हा जनतेसाठी जोमाने कार्यरत झाले. यावर्षी पुन्हा कोरोनाविरोधातील लढ्यात ते एका योद्ध्याप्रमाणे कार्यरत आहेत. आरोग्य यंत्रणा, महापालिका, सीपीआर, कोविड सेंटरसह गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ते दिवस-रात्र कार्यरत आहेत. कोरोनाच्या सध्याच्या संकटात सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधे, बेड उपलब्ध करून देण्यासाठी अनेक गरजू आवाहन करतात. रेमडेसिविर इंजेक्शन गरजू रुग्णांना मिळावेत यासाठी सुद्धा त्यांनी स्वतंत्र टीमद्वारे जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून ती इंजेक्शन मिळवून दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच थेट संपर्क करून रेमडेसिविरची मागणी आली असता संबंधित रुग्णाचे नातेवाईक, तसेच हॉस्पिटलशी संपर्क करून इंजेक्शन मिळेपर्यंत पाठपुरावा करून लोकांना दिलासा दिला. कोविड काळात गरजूपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी आमदार पाटील यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्याद्वारे गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्याचे काम ते करत आहेत.
चौकट
‘कोल्हापूर दक्षिण’मधील होम क्वॉरंटाइन असणाऱ्या लोकांशी सातत्याने संपर्क
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सध्या होम क्वॉरंटाइन असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आमदार पाटील यांनी कोविड केअर कॉल सेंटर सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून ते नागरिकांशी संपर्क साधून त्यांना औषधोपचारासाठी मदत करत आहेत. त्यांना मार्गदर्शन करून पाठबळ देत आहेत.
आमदार पाटील यांच्याकडून मदतीचा हात
१) आमदार स्थानिक विकास कार्यक्रममधून महापालिकेस ५० लाख रुपये किमतीच्या एक रुग्णवाहिका, दोन शववाहिका दिल्या.
२) कोल्हापूर दक्षिणमधील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेवा रुग्णालयांना २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स उपलब्ध करुन दिली. महापालिकेस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरकरिता आमदार विकास निधीतून २० लाखांचा निधी दिला.
३) कोल्हापूर दक्षिणमध्ये विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचे १८ कोविड सेंटर्सच्या माध्यमातून सुमारे १४०० जणांना बेड उपलब्ध करून दिले.
४) रुग्णांना मेडिसिन किट दिले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतले.
५) कोविड प्रतिबंधात्मक औषधे, इतर साधनसामग्रीसाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कॉंग्रेसच्यावतीने १० हजार सॅनिटायझर बॉटल्स, रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या सुमारे १२ हजार बॉटल्सचे वाटप केले.
६) मतदारसंघातील छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, आदी विविध घटकांना ३० हजार जणांना मास्कचे वाटप केले.
७) मतदार संघातील विविध ठिकाणच्या कोविड सेंटरमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पक्षाच्या माध्यमातून जेवण, नाष्टा आदी सुविधा पुरविल्या. शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर वॉटर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केली.
८) गांधीनगर सेवा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सिलिंडर्स, रेग्युलेटर, पेशंट ट्रॉली आदींसाठी १५ लाखांचा निधी दिला.
९) कोल्हापूर दक्षिणमधील सेवा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये कोविडवरील उपचारासाठी लागणाऱ्या मशिनसाठी ५ लाखांचा निधी दिला.
१०) सेंट झेवियर्स हायस्कूलमधील मित्र परिवाराच्या मदतीने सुमारे साडेआठ लाख रुपयांची १८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
११) शहरातील पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणीदान करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. त्याला कोल्हापूर दक्षिणमधील जनतेने प्रतिसाद दिला. एक लाख शेणी देण्याचे उद्दिष्ट असताना लोकांच्या प्रतिसादामुळे दोन लाख शेणी महापालिकेकडे सुपूर्द केल्या.
चौकट
विविध प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा
कोरोना संकटातील उद्योजक, पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना मदत मिळावी. लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळावा, आदी विविध प्रश्न आमदार पाटील यांनी शासन दरबारी मांडले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. विमानतळ विस्तारीकरणातील प्रलंबित कामांचा आढावा घेवून ती लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पदवी, पदव्युत्तर परीक्षा नियोजनबद्ध होण्यासाठी कुलगुरूंसमवेत चर्चा त्यांनी केली.
चौकट
‘सोशल कनेक्ट’ असणारे युवा आमदार
मतदारसंघातील कार्यकर्ते, जनतेशी प्रत्यक्ष संपर्काबरोबर नव्या पिढीचे माध्यम असलेल्या फेसबुक, व्हॉटसॲॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमदार पाटील हे सोशल कनेक्ट आहेत. सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत. या माध्यमांद्वारे समोर येणाऱ्या प्रश्न, समस्या समजावून घेवून त्या तत्काळ सोडविण्यावर त्यांचा भर आहे. ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मान व्हावा, यासाठी त्यांनी ट्विटरवर ‘पद्म फॉर खाशाबा जाधव’ ही मोहीम राबविली.