गत निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेकडून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, शेवटच्याक्षणी त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कृषिमंत्री दादासो भुसे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी सुचविले आहे. उपसचिव सु. सं. धपाटे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र मंगळवारी दिले आहे.
आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेकडून दुसऱ्यांदा विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची काम करण्याची असलेली धडाडी, मतदारसंघात असलेला संपर्क या जोरावर आज ना उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्याची दखल घेऊन मंत्रिमंडळात वर्णी लावतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.