इचलकरंजी : जुन्या नगरपालिकेमध्ये कर वसुली व असेसमेंट विभागाचा कक्ष ठेऊन अन्य कार्यालये स्टेशन रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्याचा निर्णय मंगळवारी नगरपालिकेमधील बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये असलेल्या कर वसुली व असेसमेंट विभागाकडे घरफाळा वसुली करण्यात येत असल्याने हे कार्यालय त्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी हा विभाग नगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नगरपालिकेच्या नूतन कार्यालयात जाण्यासाठी जास्त अंतर असल्याने या निर्णयास गावभागातील नगरसेवकांनी विरोध दर्शविला. तर मंगळवारी नगरसेवक बाळासाहेब कलागते, संजय तेलनाडे, छाया पाटील, राजेंद्र बचाटे, माजी नगरसेवक सुरेश गोंदकर, नंदू पाटील, पापा मुजावर, इलाई कलावंत, आदींनी नगराध्यक्षा बिरंजे यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, सभापती भाऊसाहेब आवळे, प्रकाश मोरबाळे, आदी उपस्थित होते.बैठकीतील चर्चेनंतर घरफाळा व असेसमेंट यासाठी जुन्या नगरपालिकेमध्ये एक लिपिक नेमण्यात येऊन त्याचा कक्ष त्याठिकाणी राहील व अन्य सर्व कार्यालये नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येतील, असे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)
नूतन इमारतीत कार्यालयांचे स्थलांतर
By admin | Updated: June 24, 2015 00:49 IST