इचलकरंजी : राज्यात असलेल्या सर्व उद्योगांसाठी सध्याच्या दरापेक्षा दीड रुपये कमी दराने वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अशा पार्श्वभूमीवर यंत्रमाग उद्योगाला सवलतीचा वीज दर उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, सोमवारी मंत्रालयात यंत्रमाग केंद्रातील सर्व आमदारांची बैठक बोलावली असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.महाराष्ट्रातील विजेच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. येथील विजेचे दर अधिक असल्याने अन्य राज्यांच्या तुलनेत यंत्रमागांवर उत्पादित कापड महाग असल्याने महाराष्ट्रातील कापड उत्पादक उद्योजकांना नुकसान होत आहे. विजेचे दर उतरले नाहीत, तर यंत्रमाग व त्याच्याशी संलग्न उद्योग-धंदे शेजारच्या राज्यात हलविण्याचा विचार उद्योजक करीत आहेत. त्यामुळे या उद्योगाला सवलतीचा वीज दर मिळावा, अशी मागणी सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी व अन्य यंत्रमाग संघटनांनी आ. हाळवणकर यांच्याकडे केली होती. आमदार हाळवणकर यांनी याबाबतचे एक निवेदन मुख्यमंत्री फडणवीस व ऊर्जामंत्री बावनकुळे यांना दिले. ऊर्जामंत्र्यांनी आजची बैठक सायंकाळी पाच वाजता आयोजित केली आहे. यावेळी प्रताप होगाडे, अशोक स्वामी, यंत्रमाग संघटनांचे पदाधिकारी, महावितरणचे कार्यकारी संचालक, आदींना निमंत्रित केले आहे. कृषी पंपाप्रमाणे यंत्रमाग उद्योगासाठी स्वतंत्र वर्गवारी असावी, अशीही मागणी आजच्या बैठकीत होईल.
यंत्रमाग उद्योगाच्या वीज दराबाबत आज बैठक
By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST