कोल्हापूर : महापालिकेच्या स्थायी समितीची आज, सोमवारची नियोजित बैठक सभासद संख्येअभावी (कोरम) तहकूब करण्यात आल्याची माहिती सभापती सचिन चव्हाण यांनी दिली. दरम्यान, बुधवारी (दि. ३) पुन्हा ‘स्थायी’ची बैठक होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. बैठक तहकूब होण्यामागे काही निविदा प्रक्रिया मंजुरी असल्याची चर्चा महापालिकेत आहे. स्थायी समितीची बैठक गेल्या काही महिन्यांपासून रद्द किंवा वादळी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण बदली प्रकरण, अधिकारी अनुपस्थितीत असतात या कारणावरून, तर कधी अधिकारी वेळेत आले नाहीत, या कारणावरून बैठक पुढे ढकलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. थेट पाईपलाईन निविदा मंजुरीसाठी तीनवेळा बैठक घेण्यात आली. ‘स्थायी’ने सुचविलेले बदल प्रशासनाने साफ फेटाळत राजकीय दबाव वापरत हवी त्या प्रमाणे निविदा मंजूर करून घेतली. त्याचा राग सदस्यांना आहे. थेट पाईपलाईन निविदेनंतर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नाहीत. राहिले तरी जुजबी उत्तरे देऊन वेळ मारून नेतात, अशी सदस्यांची तक्रार आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बैठकीसाठी अधिकारी सदस्यांची वाट पाहून निघून गेले, या कारणावरून सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर ताटकळत थांबविले. गेल्या बैठकीत उपायुक्त अश्विनी वाघमळे यांचा चीन दौऱ्याचा खर्च व त्याचा महापालिकेला झालेला उपयोग स्पष्ट करा, या कारणावरून मोठा गोंधळ झाला होता. स्थायी बैठकीत सदस्य व अधिकारी यांच्यातील दरी वाढत असतानाच आज पुन्हा सदस्य नसल्याच्या कारणावरून बैठक तहकूब करण्यात आली. गणेश उत्सवामुळे सदस्य उपस्थित राहिले नाहीत. पुढील बैठकीबाबत सदस्यांना सूचना दिल्या आहेत, असे कारण पुढे केले जात असले, तरी आचारसंहितेपूर्वी काही निविदा मंजूर करण्याबाबत एकमत न झाल्यानेच बैठक रद्द केल्याची चर्चा महापालिकेत आहे. (प्रतिनिधी) बैठकीबाबत आश्चर्य विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. गणेश उत्सवामुळे सलग सुट्याही आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेच्या आर्थिक घडामोडींशी संबंधित व महत्त्वाच्या निविदा मंजुरीचे सोपस्कार ‘स्थायी’च्या बैठकीत होणे अपेक्षित आहे. तरीही सदस्य अनुपस्थित, या कारणास्तव बैठक तहकुबीने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरमअभावी स्थायी समितीची बैठक तहकूब उत्सवाचा परिणाम
By admin | Updated: September 2, 2014 00:29 IST