कोल्हापूर : भू-विकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेबाबत आठवड्यात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्यासोबत बैठक लावून चर्चा करू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.
‘भू-विकास’च्या सेवानिवृत्त २५० कर्मचाऱ्यांचे १२ कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. त्यांच्या हक्काची ग्रॅ्च्युईटी, रजा पगार, नुकसान भरपाई, वाढीव पगार यापोटी देय रक्कम आहे. हे पैसे न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबाचा रुग्णालयासह प्रापंचिक खर्च कसा करायचा? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर असल्याचे भू-विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे संजय साळोखे यांनी सांगितले. थकीत देय रक्कमेचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे शासनदरबारी प्रलंबित आहे. यामध्ये लक्ष घालण्याची विनंती साळोखे यांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली.
यावर, येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्यासोबत याबाबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. यावेळी बंडोपंत आळवेकर, एच. एन. पाटील, पी. वाय. शिंदे, के. एम. कारवे, सुरेश तावडे, व्ही. डी. शिंदे, विजय पाटील, महादेव पाटील, डी. वाय. पाटील, दिनकर बाबर, बी. व्ही. वाळके, एस. पी. नानिवडेकर आदी उपस्थित होते.