कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होत आहे. यात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, कोविड केंद्र, लसीकरण यांचा एकत्रित आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा पोलीस, सीपीआर, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहे. आज सोमवारी रात्री आठपासून लागू होणाऱ्या कडक निर्बंधाचे पालन कशाप्रकारे करायचे, यंत्रणा कशी लावायची याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. नव्या निर्बंधानुसार धार्मिक स्थळेही बंद राहणार असल्याने त्याचेही काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत सविस्तर आदेश दिले जाणार आहेत.
दरम्यान या बैठकीच्या नियोजनाची माहीती देताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे जनतेला आवाहन केले. त्यात त्यांनी संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्या शेजारच्या सांगली, सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २० ते २२ रुग्ण संख्येवरून रविवारी १६३ पर्यंत रुग्णांची संख्या वाढली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, अगदीच आवश्यक असेल तर मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे, असे म्हटले आहे.
चौकट ०१
लसीकरण केंद्रे वाढवणार
कोल्हापूर जिल्हा हा राज्यात लसीकरणात आघाडीवर आहे. आतापर्यंत तीन लाख ८४ हजार व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. ही गती वाढविण्यासाठी आणखी केंद्रे वाढविण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. प्रशासन म्हणून आम्ही तत्परतेने उपाययोजना करतोय, परंतु नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. अशा कठिण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, आवाहनही त्यांनी केले.
अंबाबाई मंदिराबाबत होणार निर्णय -
शहरातील अंबाबाई मंदिराबाबतदेखील आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी राहणार असल्याने मंदिर दर्शनाकरिता उघडे ठेवणार का याबाबत उत्सुकता लागली आहे. याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज, बैठक होणार असून त्यात चर्चा होईल, असे सांगितले.