कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषदेची काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे या मातब्बर नेत्यांवर मात करीत उमेदवारी खेचून घेण्यात यश मिळविले. कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे यश त्यांना याकामी उपयोगी पडले. काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याची पहिली लढाई तर ते जिंकले आहेतच. आता त्यांना विजयासाठी मोर्चेबांधणी करावी लागणार आहे; कारण आमदार महाडिक यांनाच त्यांनी आव्हान दिले असून, ते त्यांना सहजासहजी विजय मिळवू देणार नाहीत. या जागेवर गेली अठरा वर्षे आमदार महादेवराव महाडिक हे कॉँग्रेसकडून प्रतिनिधित्व करतात; परंतु राजकारणात महाडिक हे तसे सर्वपक्षीय कुटुंब झाले आहे. तरीही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर हक्क सांगितला होता. त्यामुळे या वेळेला राजकीय परिस्थिती आणि नेतेही त्यांच्या विरोधात होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे यांनी सतेज पाटील यांच्या बाजूने ताकद लावलीच; शिवाय ज्येष्ठ नेते पतंगराव कदम हे तर महाडिक यांना उमेदवारी देण्याच्या ठामपणे विरोधात होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील खासगीत महाडिक यांच्या विरोधात बोलत होते. कारण या सर्वांना महापालिका निवडणुकीतील महाडिक यांची भूमिका माहीत होती. एवढे करूनही जर महाडिक यांनाच उमेदवारी दिली तर काँग्रेसमध्ये काहीही चालते, असा संदेश कार्यकर्त्यांपासून समाजापर्यंत गेला असता; म्हणून महाडिक यांचा पत्ता कट झाला. त्यांचा पत्ता कट झाल्यावर सतेज यांच्या उमेदवारीचा मार्ग लगेच मोकळा व्हायला हवा होता; परंतु तरीही त्याला शेवटच्या दिवसापर्यंत जो विलंब झाला, त्यामागे पी. एन. पाटील यांनी केलेला आग्रह कारणीभूत ठरला. त्यात पी. एन., महाडिक व प्रकाश आवाडे यांनी आपण तिघे एका बाजूला असल्याचे चित्र तयार केल्यावर प्रदेशाध्यक्षांपुढेही पेच तयार झाला. सतेज यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे; परंतु काँग्रेसमधूनच त्यांना इतका विरोध होत असताना त्यांना कशी उमेदवारी द्यायची, असाही विचार एका टप्प्यावर झाला. त्यातूनच पी. एन. पाटील यांचे नाव चर्चेत आले; परंतु त्यांना उमेदवारी दिल्यास महाडिक गप्प बसणार नाहीत आणि राष्ट्रवादी मदत करणार नाही, हे पक्षश्रेष्ठीपर्यंत गेले होते. आवाडेंचा आग्रह असला तरी ते स्पर्धेत नव्हते.
सतेज पाटील यांची मातब्बरांवर मात
By admin | Updated: December 10, 2015 01:28 IST