गणपती कोळी - कुरुंदवाड मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजना गेल्या पाच वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाची योजना पाच वर्षांपूर्वी केवळ प्रारंभ झाल्यापासून रखडली असून, याला गावातील श्रेयवादाचे राजकारण, टक्क्यांचे की ठेकेदाराची चूक कारणीभूत आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून, याची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांतून होत आहे.तीन हजार लोकवस्ती असलेल्या मजरेवाडी गावाला जुनी पाणीपुरवठा योजना आहे; मात्र आर. के. नगर, लक्ष्मीनगर, दत्तनगर या वाढीव वस्तीला पाणीपुरवठा होत नसल्याने तत्कालीन सरपंच लक्ष्मण चौगुले यांनी दोन कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर केली. त्यासाठी लोकवर्गणीतून दहा लाख रुपये गोळा करण्यात आले. कृष्णा नदीतून व पाणी शुद्धिकरण होऊन गावाला पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.२००९-१० मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली होती. कृष्णा नदीवर जॅकवेलचे बांधकाम करण्यात आले; मात्र काम अर्ध्यावरच सोडून गेल्या पाच वर्षांपासून काम बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले असून, शुद्ध व मुबलक पाण्याची प्रतीक्षा करीत पाच वर्षे झाली तरी अद्याप योजनेचे कोणतेही काम चालू नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, योजनेचा प्रारंभ झाल्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. माजी सरपंच लक्ष्मण चौगुले यांच्या यड्रावकर गटाची सत्ता जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता आली.‘स्वाभिमानी’ने पेयजल योजनेची नवी समिती नेमून अध्यक्ष नंदकिशोर पाटील, सचिव महावीर हिरीकुडे यांची नियुक्ती केली; मात्र योजना पूर्णत्वास आणून ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत या नव्या समितीने गेल्या पाच वर्षांत कोणतीही हालचाल केली नसल्याने योजनेचे काम पाच वर्षांत ‘जैसे थै’च राहिले आहे. काम रखडण्यामागे श्रेयवाद, टक्क्यांचे राजकारण की ठेकेदाराची चूक याला कोण कारणीभूत आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, गावाचे राजकारण ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पाणीपुरवठा समिती अध्यक्ष नंदकिशोर पाटील व ठेकेदार कृष्णा पोवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.जॅकवेलचे बांधकाम अर्धवट२००९-१० मध्ये पेयजलच्या कामास सुरुवात झाली होती. कृष्णा नदीवर जॅकवेलचे बांधकाम करण्यात आले आहे. ते काम गेल्या पाच वर्षांपासून अर्ध्यावरच असल्यामुळे बांधकामाला वापरण्यात आलेल्या सळ्या पूर्णपणे गंजल्या आहेत. त्यामुळे येथून पुढचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
मजरेवाडी पेयजल योजना पाच वर्षांपासून रखडली
By admin | Updated: January 15, 2015 23:32 IST