लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी मुख्य मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच आज (मंगळवारी) गुढीपाडव्याचा सण असल्याने व दोन दिवसांनी परत लॉकडाउन होणार, या भीतीने बाजारपेठा फुल्ल झाल्याचे चित्र होते. वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी अनेक नागरिकांनी कोरोना नियमांचा फज्जा उडवला होता.
सोमवारी शहरातील सर्व दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, १३ व १४ एप्रिलला सुट्टी व त्यानंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार असल्याने बाजारपेठेत सर्वत्र नागरिकांचा वावर होता.
बँका, किराणा दुकान यासह रस्त्यावर गर्दी अधिकच जाणवत होती. लॉकडाऊन होणार असल्यामुळे यंत्रमाग कारखानदारांनी पगाराची रक्कम आणण्यासाठी गर्दी केली. येथे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यात येत नव्हते. वयोवृद्ध नागरिकांचीही संख्या अधिक होती.
गांधी पुतळा, के. एल. मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती शाहू महाराज पुतळा, डेक्कन चौक, सरस्वती मार्केट परिसरात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुढी उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साखरेच्या गाठी, फुलांच्या माळा, तसेच किराणा माल दुकानांमध्येही वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले जात होते, तर बहुतांश ठिकाणी नागरिक नियम पायदळी तुडवत होते. यावेळी गांधी पुतळा ते छत्रपती शाहू महाराज पुतळा या मुख्य मार्गावर गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. कोरोना संसर्गाची गंभीर स्थिती असतानाही बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्कदेखील नव्हते.
चौकट
दुप्पट भावाने विक्री
बाजारपेठेत अनेक वस्तूंची दुप्पट भावाने विक्री केली जात होती. बाजारात मालाची आवक कमी असल्याने तसेच पुन्हा लॉकडाऊन होणार असल्यामुळे अधिक किमतीत वस्तूंची विक्री सुरू होती.
फोटो ओळी
१२०४२०२१-आयसीएच-०२
वीकेंड लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर सोमवारी इचलकरंजीत मुख्य रस्त्यावर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.
१२०४२०२१-आयसीएच-०३
लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी फळ मार्केट येथे मोठी गर्दी केली होती.
१२०४२०२१-आयसीएच-०४
नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत एका आईस्क्रिम दुकानात व दुकानाबाहेर गर्दी केली होती.
१२०४२०२१-आयसीएच-०५
आज (मंगळवारी) होणाऱ्या गुढीपाडवा सणानिमित्त गुढीसाठी नागरिकांनी काठी खरेदी केली.
१२०४२०२१-आयसीएच-०७
दुचाकीवरून गुढीपाडव्यासाठी नागरिक काठी घेऊन जात होते.
सर्व छाया-उत्तम पाटील