कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धार्मिक, साहसी, कौटुंबिक, ऐतिहासिक अशा सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी मोठा वाव आहे. मात्र, सर्वत्र केवळ चकचकीतपणा न आणता आहे ते कोल्हापूर पर्यटकांना उत्तम पद्धतीनं दाखवा. मुख्य म्हणजे कोल्हापूरच्या या शक्तिस्थळांचं जगात मार्केटिंग करा, असे आवाहन महाराष्ट्र टूर्स आॅर्गनायझर्स असोसिएशनचे अध्यक्ष व वीणा वर्ल्डचे संंस्थापक सुधीर पाटील यांनी रविवारी केले. कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कोल्हापूर हॉटेल मालक संघाने फॅम टूर आयोजित केली होती. तीन दिवसांच्या या उपक्रमाचा समारोप रविवारी संध्याकाळी शाहू स्मारक भवनमध्ये झाला. यावेळी पाटील बोलत होते. सुधीर पाटील म्हणाले, पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप विकसित होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय अद्ययावत होणे, दिशादर्शक फलक, वाहतूक व्यवस्थापन, गाइड लिस्ट, उत्तम प्रतीची छायाचित्रे, उत्तम दर्जाच्या जाहिराती यांच्या मध्यमातून पर्यटन विकासाला गती देता येईल. जिल्ह्यात दरवर्र्षी ६० लाख पर्यटक येतात. सुमारे सात हजार खोल्या निवासासाठी उपलब्ध असून साठ टक्के पर्यटक जरी निवासी राहिले तरी त्यातून ३३० ते ४०० कोटी महसूल जमा होतो. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारा पर्यटक तीन-चार दिवस थांबावा यासाठी शहर आणि जिल्ह्यात चार-पाच पर्यटन स्थळे नव्याने विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असून यामध्ये महापौरांनी पुढाकार घ्यावा. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, डॉ. जयसिंगराव पवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य वनसंरक्षक श्री. राव, टूर आॅर्गनायझर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभुलाल जोशी, सहसचिव चिमण मोटा, सिद्धार्थ लाटकर, शाहू ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) पर्यटन नकाशामध्ये कोल्हापूरचा समावेशच नाही यावेळी बोलताना सुधीर पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशामध्ये औरंगाबाद, नागपूरचा समावेश आहे; परंतु कोल्हापूरचा नाही, ही खरेच विचार करण्याजोगी बाब आहे. या नकाशामध्ये येण्यासाठी जे जे हवं ते कोल्हापूरमध्ये असल्यानं नकाशात कोल्हापूरचा समावेश होणं गरजेचं आहे. यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी आपण उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटणार असे स्पष्ट केले.
आहे त्या कोल्हापूरचं मार्केटिंग करा
By admin | Updated: October 17, 2016 01:06 IST