सद्गुरु पाटील - पणजी स्पेशल ज्युरी आणि सेंटेनरी असे दोन पुरस्कार मिळवत ‘एक हजाराची नोट’ या मराठी चित्रपटाने येथे ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मराठीचा झेंडा फडकविला. ‘लिविआथन’ या रशियन चित्रपटास सुवर्ण मयूर प्राप्त झाला. अकरा दिवसांच्या ‘इफ्फी’चा रविवारी दिमाखात समारोप झाला. श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’ चित्रपटास स्पेशल ज्युरी आणि सेंटेनरी हे दोन्ही पुरस्कार मिळाले. गेल्या काही वर्षांत इफ्फीत एखाद्या मराठी चित्रपटाला एवढा मोठा बहुमान प्रथमच प्राप्त झाला. ग्रामीण महाराष्ट्रातील एका महिलेला आमदाराकडून निवडणूक काळात एक हजाराची नोट मिळते. या पैशांतून विविध स्वप्ने साकार होणार असल्याच्या आनंदात ती असतानाच शहरामध्ये तिच्या वाट्याला कसे अनुभव येतात, यावर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो. अभिनेत्री वहिदा रेहमान आणि राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते ‘लिविआथन’ चित्रपटाचे दिग्दर्शक अँड्री यांनी सुवर्ण मयूर पुरस्कार स्वीकारला. चाळीस लाख रुपये व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तरुण चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वाँग कार वाय यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराबाबत खूप अभिमान व आश्चर्यही वाटतेय; कारण मला हा पुरस्कार लवकर मिळाला. मी अजून निवृत्तीच्या वाटेवर नाही. मी या पुरस्काराचे श्रेय पत्नीला देतो, असे वाँग कार वाय म्हणाले. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अॅलिना रॉड्रिगीज व सरित लरी यांना विभागून देण्यात आला. (प्रतिनिधी)
‘इफ्फी’त मराठी पताका
By admin | Updated: December 1, 2014 00:00 IST