कोल्हापूर : महापालिकेतील अधिकारी बेकायदेशीर, वर्क ऑर्डर होण्यापूर्वी रस्त्यांच्या कामाला मान्यता देत आहेत. जेथे आवश्यक आहेत तेथे रस्ते केले जात नसून माजी नगरसेवक सुचवतील तेथे केले जात आहेत. सध्या महापालिकेमध्ये प्रशासकराज सुरू असून रोटेशनप्रमाणे रस्ते करावेत. माजी नगरसेवकांचा बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १४ व्हिनस कॉर्नरमध्ये घोरपडे गल्ली येथे गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या निधीतून विकासकामे झालेली नाहीत. या उलट माजी नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे इतर ठिकाणी ॲडव्हान्स कामे केली जात आहेत. या कामांचीही लांबी, रुंदी व दर्जा तपासणी करूनच बिल देण्यात यावे. तसेच बजेटची तरतूद करताना गेली २० वर्षे जेथे रस्ते झाले नाहीत, अशा ठिकाणी रोटेशन पद्धतीने रस्ते करावेत. माजी नगरसेवकांची दमदाटी खपवून घेऊ नये.