राम मगदूम।
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी जनता दलाच्या विरोधात महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. किंबहुना, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने नव्या राजकीय गठबंधनाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
गेल्यावेळी तत्कालीन सत्ताधारी जनता आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजपा-सेना युती असा तिरंगी सामना झाला होता. त्यात थेट नगराध्यक्ष पदासह ११ जागा जिंकून ''''जद''''ने बाजी मारली. राष्ट्रवादीला ४, भाजपाला २ व शिवसेनेला १ जागा मिळाली. त्यानंतर वाढीव प्रभागाच्या निवडणुकीत जद-राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळाली.
निवडणुकीनंतर भाजपा-सेना ''''जद''''बरोबर आघाडी करून सत्तेत गेल्यामुळे राष्ट्रवादी हाच विरोधक राहिला. परंतु, राष्ट्रवादीने वाढीव प्रभागाची निवडणूक ''''जद''''सोबत लढविल्याने पालिकेत विरोधी पक्षच उरला नाही, असे काहीसे झाले होते. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ''''जद'''' आणि राष्ट्रवादी पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, त्याचवेळी आगामी राजकारणाची झलक दिसली.
---------------------------------------------
* चौथ्यांदा आव्हान ?
१९९१, २००१ व २०११ च्या निवडणुकीत ''''जद''''ला सत्तेवरून खाली खेचण्याचे प्रयोग झाले. बाबासाहेब कुपेकर यांनी शाहू आघाडी व महालक्ष्मी आघाडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविले होते. त्यानंतर मुश्रीफ व कुपेकर यांनी राष्ट्रवादीतर्फे आव्हान देऊन पालिकेची सत्ता मिळवली. परंतु, राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोडीचा फायदा उठवून ''''जद''''ने पुन्हा सत्ता हस्तगत केली.
---------------------------------------------
* ''''शिंदें''''शी दोस्ती नको ?
मुश्रीफ यांनी गडहिंग्लज कारखान्याच्या गेल्या निवडणुकीत विधानसभेच्या मागील दोन निवडणुकीत विरोधकांना मदत केलेल्या श्रीपतराव शिंदेंच्याबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांनी हा ''''दोस्ताना'''' विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. परंतु, शहरातील काही कार्यकर्त्यांना तो रुचलेला नाही.
---------------------------------------------
* ''''कौतुक'''' रुचले नाही !
आठवड्यापूर्वी नगरपालिकेच्या कार्यक्रमात शिंदेंनी, भविष्यातही आपले नगरसेवक एकसंध राहतील आणि सत्तेपासून वंचित अल्पसंख्याकांचा सन्मान आपलीच आघाडी करेल, अशी सूचक टिपणी केली, तर मुश्रीफ यांनी नगराध्यक्षा स्वाती कोरी व त्यांचे पती महेश यांचे तोंडभरून कौतुक केले. हे कौतुकदेखील राष्ट्रवादीच्या काहींना रुचले नाही.
---------------------------------------------
* मुश्रीफांची सावध भूमिका
गेल्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीला उमेदवार उसना घ्यावा लागला. त्यामुळे ''''पूर्वानुभव'''' विचारात घेऊनच मुश्रीफांची वाटचाल सुरू आहे. पालिका निवडणुकीपूर्वी होणाऱ्या गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीतही मुश्रीफांना शिंदेंची साथ आवश्यक आहे. म्हणूनच त्यांच्याही हालचाली सावधपणे सुरू आहेत.
---------------------------------------------
* पालिकेतील सध्याचे बलाबल :
जनता दल १३, राष्ट्रवादी ५, भाजपा १, शिवसेना १. ---------------------------------------------
* हसन मुश्रीफ : ०४०१२०२१-गड-०४
* श्रीपतराव शिंदे : ०४०१२०२१-गड-०५