जयसिंगपूर : चालू गळीत हंगामासाठी आलेल्या उसास एकरकमी एफआरपी विनाकपात २८६४ रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी, वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढण्यात आली असल्याची माहिती टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली.
ऊस गाळप सुरू झाल्यापासून पहिल्या पंधरवड्यातील ५ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गाळप केलेल्या ५० हजार ३६८ मे. टन उसाला एकरकमी एफआरपी २८६४ रुपयेप्रमाणे १४ कोटी ४२ लाख ६१ हजार रुपये अदा केले आहेत. यंदाच्या हंगामात उसाचे वाढलेले क्षेत्र, कोरोनाच्या हंगामावर असणारे सावट, ऊसतोडणी मजुरांची उपलब्धता या सर्व अडचणींवर मात करीत गुरुदत्त शुगर्स या हंगामात आठ लाख मे. टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करणार असल्याचेही सांगितले. कारखान्याने नेहमीच भागामध्ये उच्चांकी ऊसदराची परंपरा अखंडितपणे ठेवली असल्याने शेतकऱ्यांची विश्वासार्हता हीच ‘गुरूदत्त’ची ओळख बनली आहे.
ऊस गाळपाबरोबरच कारखान्याने आधुनिक यंत्रसामग्री वापरून साखर कारखानदारीत आदर्श निर्माण केला आहे. काटकसर व दूरदृष्टीच्या व्यवस्थापनामुळे कारखान्याचे अनेक उपक्रम देशपातळीवर चमकले आहेत. शेतकऱ्यांनी चालू गळीत हंगामासाठी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्ष घाटगे यांनी केले.
फोटो - ०३१२२०२०-जेएवाय-०१-माधवराव घाटगे